सॅमसंग एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असलेले स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. आज देखील भारतात कंपनीने नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केला आहे. सॅमसंगने Galaxy S23 FE लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE हा फोन गॅलॅक्सी S22 FE च्या पुढचे अपडेटेड मॉडेल आहे. नवीन फॅन एडिशन फ्लॅगशिप गॅलॅक्सी S23 सिरीजमध्ये एक लहानसे व्हर्जन आहे. जे या वर्षीच्या सुरुवातीला सादर करण्यात आले होते. या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक जाणून घेऊयात.
सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE: फीचर्स
नवीन सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE मध्ये वापरकर्त्यांना ६.३ इंचाचा एफएचडी + OLED डिस्प्ले मिळणार आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असणार आहे. डिस्प्लेमध्ये मध्यभागी पंच कटआऊट बघायला मिळतो. या फोनचे बॅक पॅनलचे डिझाइन फ्लॅगशिप S23 सिरीजप्रमाणे आहे. या फोनमध्ये विशेष करून भारतात Exynos 2200 या चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात वापरकर्त्यांसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आले आहे. हूड अंतर्गत या फोनमध्ये ४५०० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच याला २५ W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. कदाचित हे खरेदी करणाऱ्यांसाठी एक समस्या असू शकते कारण हल्ली स्मार्टफोनला कमीत कमी ८० W चे चार्जिंग सपोर्ट मिळतो. सॅमसंग या फोनच्या बॉक्समध्ये चार्जर देत नाही. कंपनीने हा फोन ३० मिनिटांमध्ये ५० टक्के चार्ज होतो असा दावा केला आहे. यामध्ये वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि ब्लूटूथ ५.३ सारखे कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स मिळतात.
भारतातील किंमत आणि उपलब्धता
सॅमसंग गॅलॅक्सी S23 FE हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची भारतातील सुरुवातीची किंमत ४९,९९९ रुपये इतकी आहे. डिव्हाइसची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे. मात्र या डिव्हाइसवर HDFC बँकेकडून १० हजारांच्या डिस्काउंट ऑफरनंतर या फोनची किंमत ४९,९९९ रुपये इतकी कमी झाली आहे. खरेदीदार आजपासून हा स्मार्टफोन Amazon च्या माध्यमातून खरेदी करू शकणार आहेत. याची डिलिव्हरी ७ ऑक्टोबरपासून सुरु होईल. हा फोन खरेदीदार मिंट, क्रीम, ग्रेफाइट आणि पर्पल रंगात खरेदी करू शकतात.