Online Crime Via Metaverse: तंत्रज्ञानाने जग जवळ आणलंय हे खरं असलं तरी यामुळे जगभरातील गुन्हेगार सुद्धा आपल्या अगदी पुढ्यातच आणून ठेवले आहेत. याच जागतिक गुन्ह्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील पोलिसांनी इंटरपोल प्रणाली सुरु केली आहे. या इंटरपोलचे सरचिटणीस जुर्गन स्टॉक अलीकडेच म्हणाले की, गुन्हेगार अत्याधुनिक आणि व्यावसायिक झाल्याने एजन्सीला सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर एक पाऊल पुढे जाऊन करणे आवश्यक झाले आहे. मेटाव्हर्समध्ये घडणाऱ्या गुन्ह्याचा तपास कसा करता येईल याचा तपास करण्यासाठी जागतिक पोलीस आता सज्ज झाले आहेत.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार,मेटाव्हर्समधील गुन्हयांना आळा घालण्यासाठी इंटरपोलने वापरकर्त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. सर्व सदस्यांना आपली व्हर्च्युअल उपस्थिती व सोशल मीडियाचा वापर वाढवण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगार अत्याधुनिक आहेत, गुन्हे करण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही नवीन तांत्रिक साधनाशी त्वरित जुळवून घेतात. त्यामुळे पोलिसांना सुद्धा तंत्रज्ञानासह सांगड घालून काम करणे गरजेचे आहे.
इंटरपोल मधील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या व्हर्च्युअल रिअॅलिटी स्पेसमध्ये फक्त सुरक्षित सर्व्हरद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो. हे पोलिस अधिकाऱ्यांना मेटाव्हर्सचा अनुभव घेण्यास मदत करते, त्यांना कोणते गुन्हे घडू शकतात आणि ते भविष्यात कसे हाताळले जाऊ शकतात याची कल्पना या माध्यमातून दिली जाते.
हे ही वाचा<< एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या
मेटाव्हर्समध्ये घडू शकतील अशा गुन्ह्यांबद्दल बोलताना इंटरपोलचे इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान संचालक डॉ मदन ओबेरॉय म्हणाले की डिजिटल जगात लैंगिक छळाची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. प्रत्यक्ष गुन्हेगारांना पकडण्याहून त्यांची ऑनलाईन उपस्थिती तपासणे हा टास्क कठीण आहे. त्यामुळे जर तुम्हाला पीडितांना मदत करायची असेल व गुन्हेगारांना पकडायचे असेल तर तर आधी दोघांमधील माध्यम समजून घेणे आवश्यक आहे.