श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याला शनिवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. गळा आवळून आफताबने १८ मे रोजी श्रद्धची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबने ३०० लिटर क्षमतेचा फ्रिज विकत घेतला होता. तीन आठवडे तो रोज एक-दोन तुकडे जंगलामध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावत होता. सध्या श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.
श्रद्धा हत्याकांडाची सध्या देशभरामध्ये चर्चे आहे. गुगलवरही या हत्याकांडासंदर्भातील सर्चमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आफताबचा धर्म कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी लोक गुगलबरोबरच त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइललाही भेट देत आहेत. मागील काही दिवसांमध्ये श्रद्धा हत्या प्रकरण हे भारतामध्ये गुगलवरील सर्वाधिक सर्च झालेल्या टॉपिक्सपैकी आहे.
याच प्रमाणे डेक्सटर या वेब सिरीजसंदर्भातील सर्चही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. आफताबने या अमेरिकी क्राइम वेबसिरीजमुळे आपल्याला अशाप्रकारे श्रद्धाच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचल्याचं कबुली जाबाबात म्हटल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. गुगल ट्रेण्डमध्येही डेक्सटर टॉप सर्च टॉपिकमध्ये दिसून येत आहे. सध्या अनेकजण श्रद्धा वालकर फेसबुक असंही मोठ्या प्रमाणात सर्च करत आहेत.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पोलिसांनी ‘तो’ प्रश्न विचारताच आफताब रडू लागला; ५४ हजार रुपयांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा
आफताब नेमका कोणत्या धर्माचा आहे यासंदर्भातही भारतीयांना उत्सुकता असून गुगल सर्चवर त्यासंदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गुगलवरुन श्रद्धाचं इन्स्टाग्राम हॅण्डल शोधणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. गुगल सर्च ट्रॅफिक ग्राफप्रमाणे श्रद्धाचं इन्स्टाग्राम अकाऊंट गुगलवरुन सर्च करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.
नक्की पाहा >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस
गुगल ट्रेण्ड्समध्ये लोक नेमकं काय शोधत आहेत याबद्दलची माहिती मिळते. गुगलकडूनच यासंदर्भातील सेवा पुरवण्यात आली आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये नेमके कोणते विषय चर्चेत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. मात्र यामधून नेमकी आकडेवारी समोर येत नाही. असं असलं तरी कोणत्या विषयांबद्दल इंटरनेटवर चर्चा सुरु आहे, त्या विषयांमधील उपविषय कोणते आहेत याचा अंदाज या गुगल ट्रेण्डवरुन लावता येतो.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”
या प्रकरणाशी संबंधित विषयांबद्दलच्या गुगलवरील सर्च करण्यात आलेल्या विषयांच्या यादीत ‘डेटींग’, ‘लव्ह-जिहाद’, ‘डेक्सटर’, ‘डेक्सटर टीव्ही सिरीज’ यासारख्या विषयांचा समावेश आहे. तसेच ‘दिल्ली मर्डर’ हा शब्दही मोठ्या प्रमाणात शोधला जात आहे. या विषयाशी संबंधित लिंक्स आणि बातम्या शोधण्याचं प्रमाण ४५० टक्क्यांनी वाढलं आहे. ‘श्रद्धा मर्डर केस’ हा सर्वाधिक सर्च केलेला विषय आहे.