मोबाईलच्या मागे वाया गेलेली पिढी असे टोमणे ऐकून तुम्हीही थकला असाल ना? लंडनच्या युनिव्हर्सिटी मध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका अभ्यासात असं काही समोर आलं आहे की ज्यामुळे आजवर तुम्हाला मोबाईल वापरण्यापासून रोखणारी मंडळीच तुम्हाला अजून फोन वापर असं आनंदाने सांगतील. रिपोर्ट्स नुसार, मोबाईल, लॅपटॉप व अन्य डिजिटल डिव्हाईस वापरणाऱ्यांच्या स्मरणशक्ती मध्ये कमालीने वाढ झाल्याची नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे. मोबाईलमुळे आळशीपणा वाढत असल्याच्या सर्व समजुतींना छेद देणारा असा हा रिसर्च सध्या बराच चर्चेत आहे.
जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की डिजिटल उपकरणे लोकांना खूप महत्त्वाची माहिती साठवून ठेवण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करतात. यामुळे, अतिरिक्त महत्त्वाच्या गोष्टी आठवण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती मोकळी होते.
यापूर्वी अनेक मानसोपचार तज्ज्ञ व न्यूरोसायन्स अभ्यासकांनी तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे संज्ञानात्मक क्षमता बिघडू शकते आणि ‘डिजिटल डिमेंशिया’ वाढू लागतो अशी चिंता व्यक्त केली होती मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार बाह्य मेमरी म्हणून डिजिटल उपकरणाचा वापर केल्याने लोकांना केवळ डिव्हाइसमध्ये जतन केलेली माहिती लक्षात ठेवण्यास मदत होत नाही तर त्यांना जतन न केलेली माहिती देखील लक्षात ठेवण्यास मदत होते.
हा रिसर्च नेमका कसा पार पडला?
१८ ते ७१ या वयोगटातील तब्बल १५८ व्यक्तींसह हा रिसर्च करण्यात आला होता. यात सहभागींना स्क्रीनवर आकडे लिहिलेली १२ वर्तुळे दाखवण्यात आली होती आणि यापैकी काही डावीकडे आणि काही उजवीकडे ड्रॅग करणे लक्षात ठेवायचे होते. योग्य बाजूला ड्रॅग करणाऱ्यांना प्रयोगाच्या शेवटी पेमेंट दिले जाईल असे सांगण्यात आले होते. दोन्ही बाजूस ‘उच्च व कमी मूल्य’ असे नाव देण्यात आले होते. उच्च मूल्याच्या बाजूस वर्तुळ आणल्यास १० पट अधिक कमाईची संधी होती.
या सहभागिनीं हे कार्य १६ वेळा केले. त्यांना चाचण्या लक्षात ठेवण्यासाठी अर्धी स्वतःची मेमरी वापरावी लागली आणि त्यांना उर्वरित अर्ध्यासाठी डिजिटल डिव्हाइसवर मेमरी कार्ड सेट करण्याची परवानगी देण्यात आली.
परिणामांमध्ये असे दिसून आले की सहभागींनी उच्च-मूल्य असलेल्या वर्तुळातील तपशील संग्रहित करण्यासाठी डिजिटल उपकरणांचा वापर केला. आणि, असे केल्यावर, त्यांची स्मरणशक्ती १८ % ने सुधारली. कमी-मूल्य कडे वर्तुळ वळवलेल्या सहभागींची स्मृती देखील २७% ने सुधारली.
जरी हे प्रयोग टचस्क्रीन टॅब्लेट वापरून केले गेले असले तरी, संशोधन स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मेमरीच्या सामान्य तत्त्वांची तपासणी करण्यासाठी डिझाइन केले गेले होते. त्यामुळे, संशोधकांना अपेक्षा आहे की हे निष्कर्ष स्मार्टफोनवर इतर मेमरी उपकरणांप्रमाणेच लागू होतील, भविष्यात विशेषत: स्मार्टफोनचा मेमरीवरील प्रभाव निश्चित करण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे.