पीटीआय, बंगळूरु

चंद्रयान-३ मोहिमेंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या ‘विक्रम’ या लँडरने सोमवारी चक्क पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केले.. एक लहानशी उडी मारून विक्रम सुमारे ४० सेंटीमीटर उंचीवर जाऊन ३० ते ४० सेंटीमीटर मागे सरकून पुन्हा उतरविण्यात आले. एका अर्थी ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उडी (हॉप टेस्ट) मारू शकतो का, याची चाचपणी करण्यात आली. भविष्यात चंद्रावरील माती, खडक याचे नमूने आणण्यासाठी किंवा मानवी मोहिमांसाठी चंद्राच्या पृष्ठभागावरून पुन्हा उड्डाण करण्याच्या दिशेने हा प्रयोग करण्यात आला.

सोमवारी सकाळी ८ वाजता ‘विक्रम’ला निद्रावस्थेत पाठविण्यात आले. त्याच्यावरील उपकरणे बंद करण्यात आली असले तरी, रिसिव्हर चालू ठेवण्यात आला आहे. निद्रिस्त होण्यापूर्वी त्याची हॉप टेस्ट घेण्यात आली. नव्या जागेवर गेल्यावर चॅस्टे, राम्भा आणि इल्सा पेलोडद्वारे प्रयोग करण्यात आले. त्याची माहिती पृथ्वीवर प्राप्त झाली आहे. त्यानंतर हॉप टेस्ट घेण्यासाठी पेलोड आणि रॅम्प दुमडून ठेवण्यात आले. लँडरचे इंजिन पुन्हा सुरू केल्यानंतर त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर टुणदिशी छोटी उडी मारली, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’ एक्स समाजमाध्यामवर जाहीर केले. ‘प्रज्ञान’ या रोव्हरनंतर विक्रमलाही निद्रावस्थेत पाठविण्यात आले असून आता २२ सप्टेंबपर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र असेल. पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर दोन्ही याने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हेही वाचा >>>“प्रज्ञानपाठोपाठ ‘विक्रम’ही झोपी गेला, आता थेट…”, इस्रोकडून चांद्रमोहिमेचा पुढचा प्लॅन जाहीर, म्हणाले…

पुढे काय?

विक्रम आणि प्रज्ञान या दोघांनी नियोजित वेळेमध्ये सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आता त्यांच्यावरील उपकरणे बंद ठेवण्यात आली आहेत. दक्षिण ध्रुवावर रात्रीच्या वेळी तापमान उणे १०० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होण्याची शक्यता असते. मात्र लँडर आणि रोव्हरवरील बॅटरीतून ऊर्जा देऊन उपकरणे उष्ण राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा दिवस उजाडल्यावर सौरऊर्जेवर बॅटरी पुन्हा चार्ज केली जाईल व आणखी संशोधन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हेही वाचा >>>Chandrayaan 3 नंतर पुढची चांद्र मोहीम कोणती? ISRO ने Vikram Lander वर ‘हा’ प्रयोग करत दिले संकेत…

‘विक्रम’ लँडरवरील कॅमेऱ्याने ‘हॉप टेस्ट’च्या आधी व नंतर टिपलेली ही छायाचित्रे. पहिल्या छायाचित्रापेक्षा प्रज्ञानचा उतरता मार्ग (रॅम्प) दुसऱ्या छायाचित्रात थोडासा दूर गेल्याचे दिसत आहे.