छत्रपती संभाजीनगर : चंद्रयान अभ्यासाचे यशस्वी कार्यान्वयन झाल्यानंतर आणि ‘आदित्य’च्या निमित्ताने सूर्याभोवतीच्या वातावरणाचा आणि वायूच्या अभ्यासाकडे पावले पडत आता भारतातील शास्त्रज्ञांचे लक्ष हिंगोली येथून सुरू करावयाच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या ‘लिगो इंडिया’ प्रकल्पाकडे लागले आहे. पंतप्रधानांनी या प्रकल्पासाठी अलीकडेच २६०० कोटी रुपये मंजूर केले असून हे गुरुत्वीय लहरींचे निरीक्षणगृह २०३० पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील हॅन्डफोर्ड, लिव्हींगस्टन अशा जगातील दोन प्रयोगशाळांबरोबर हिंगोली येथे आता तिसरी प्रयोगशाळा असणार आहे. इटली आणि जपाननंतर गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासक देशांमध्ये या पुढे भारताचाही समावेश होणार आहे. त्यामुळे आता मागास हिंगोलीतून थेट जगाकडे पाहण्याचा नवा मार्ग विकसित होणार असल्याने त्याबाबत हिंगोलीकरांमध्येही कमालीचे औत्सुक्य आहे.

हेही वाचा >>>Chandrayaan 3 : चंद्रावर ‘विक्रम’ची लांब उडी, इस्रोने शेअर केलेला VIDEO पाहिलात का?

गुरुत्वीय लहरी आणि अंतराळ संशोधनातील विज्ञान आणि अभियांत्रिकीवर प्रकाश टाकणाऱ्या या अभ्यासासाठी काटकोनात छेदणारे इंग्रजी ‘एल’ आकाराची निर्वात पोकळी निर्माण करणारे दोन बाहू तयार केले जाणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या टोकाला संवेदशील आणि मृदू आरसे बसविले जाणार आहेत. जेथे हे दोन पोकळीचे मार्ग मिळतात तेथून एक प्रकाशझोत एकाच वेळी दोन्ही बाजूला जातील अशा पद्धतीने सोडले जातील. प्रकाश किरण आरशावर परावर्तीत होऊन एकाच वेळी परत येतील असे अपेक्षित असते. पण जेव्हा गुरुत्वीय लहरीचा या प्रकाशकणांशी संबंध येतो तेव्हा निर्वात मार्गिकेचा एक भाग प्रसरण पावतो आणि दुसरा आकुंचन पावतो. प्रकाशकिरणही परावर्तीत होऊन वेगवेगळय़ा वेळी येतात. कृष्ण विवरात गुरुत्वीय लहरी निर्माण होतात. त्यामुळे त्याचे परिणाम शोधण्यासाठी होणारा हा वैज्ञानिक प्रयोग विश्व निर्मितीचे गूढ उकलणारा ठरू शकतो म्हणून वैज्ञानिकांना या प्रयोगाची उत्सुकता आहे.

हेही वाचा >>>“प्रज्ञानपाठोपाठ ‘विक्रम’ही झोपी गेला, आता थेट…”, इस्रोकडून चांद्रमोहिमेचा पुढचा प्लॅन जाहीर, म्हणाले…

प्रकल्प विस्तार सहा खेडय़ांत

हिंगोली जिल्ह्यातील या दोन बाहूंचा हा परिसर ४३० एकरांवरचा असून त्याचे क्षेत्र सहा खेडय़ांपर्यंत विस्तारलेले आहे. या बाहूंचा व्यास १.२ मीटर एवढा पाईपसारखा असून त्यात प्रकाशझोत टाकला जाणार आहे. हा भूप्रदेश समुद्रसपाटीपासून ४२८ ते ४५२ मीटर उंचीवर आहे. पडीक आणि खडकाळ जमिनीवरील या प्रयोगाची मोठी उत्सुकता या भागात असल्याने प्रकल्पाला जमीन देतानाही फारसा विरोध झाला नाही.

कामाला वेग अपेक्षित

ज्वालामुखी किंवा भूगर्भातील लहरी नसणारा भाग या प्रकल्पासाठी लागणार होता. म्हणून शास्त्रज्ञांनी निवडलेल्या जागेसाठी हेक्टरी २० लाख रुपये भूसंपादनाचा दर दिल्यामुळे लिगो इंडियाच्या या प्रकल्पाचे कामकाज वेगाने पुढे सरकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा >>>Chandrayaan 3 नंतर पुढची चांद्र मोहीम कोणती? ISRO ने Vikram Lander वर ‘हा’ प्रयोग करत दिले संकेत…

स्वदेशी साधने, रोजगार

या प्रकल्पासाठीचा ‘प्रोटोटाईप’ भारतातच बनविण्यात आला आहे. प्रयोगाचे विश्लेषण करणारी यंत्रणा आता उभारण्यात आली आहे. अंतराळ संशोधन आणि अंतराळ भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी येथील विदा वापरली जाऊ शकते. या निमित्ताने हिंगोलीमध्ये रोजगार निर्मिती होऊ शकेल, असेही सांगण्यात येत आहे.