चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी खेळला गेलेला पावसामुळे प्रभावित झालेल्या विजेतेपदाचा सामना अतिशय रोमांचक झाला. अंतिम सामन्यामध्ये हजारो प्रेक्षकांनी स्टेडियमवर हजेरी लावली होती. सामन्यात पावसाचा व्यत्यय येत होता मात्र तरीही प्रेक्षकांचा उत्साह कमी झाला नव्हता. मात्र स्टेडियम पेक्षा जास्त लोकांनी हा सामना टीव्ही आणि अॅपवर पाहिला आहे.
जिओ सिनेमावर तब्बल ३.२ कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा अंतिम सामना पहिला आहे. या संख्येने आधीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले असून जिओसिनेमाने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अंतिम सामन्याआधी झालेल्या क्वालिफायर २चा सामना जो मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये खेळला गेला त्यामध्ये २.५७ कोटी लोकांनी जिओसिनेमावर हा सामना पाहिला. ज्यामध्ये गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने १२९ धावांची शानदार खेळी केली होती. याबाबतचे वृत्त बिझनेस टूडेने दिले आहे.
डिस्नी + हॉटस्टारचा देखील मोडला रेकॉर्ड
२०१९ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान, टाटा आयपीएलचे आधीचे डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर डिस्नी + हॉटस्टारवर २.५ कोटी लोकांनी सामना पाहिल्याचा रेकॉर्ड झाला होता. जो २०२३ च्या कालच्या अंतिम सामन्यापर्यंत तुटला नव्हता. यावर्षी जिओसिनेमाच्या येण्याने हा रेकॉर्ड तुटला आहे. आणि जिओसिनेमाने नवीन रेकॉर्ड रचला आहे.
हेही वाचा : WhatsApp ने ‘या’ युजर्ससाठी रोलआऊट केले Status Archive फिचर, जाणून घ्या काय होणार फायदा
JioCinema आणि NBCUniversal ने भारतामध्ये हजारो तासांची NBCUniversal चित्रपट आणि टीव्ही सिरीज आणण्यासाठी अनेक वर्षांची भागीदारी केली आहे. या भागीदारीसह डाउनटाउन अॅबी, सूट, द ऑफिस, पार्क्स आणि रिक्रिएशन आणि द मिंडी प्रोजेक्ट यासह NBCU च्या विस्तीर्ण लायब्ररीतील समीक्षकांनी प्रशंसित आणि चाहत्यांच्या आवडीची नाटके आणि कॉमेडी कंटेंट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.
जिओसिनेमाने प्रीमियम प्लॅन लॉन्च केल्यामुळे वापरकर्ते आता HBO सारख्या कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहेत. JioCinema Premium पाहता येणाऱ्या काही सर्वोत्तम HBO कंटेंटमध्ये द लास्ट ऑफ अस, हाऊस ऑफ द ड्रॅगन आणि सक्सेशन यांचा समावेश आहे. जिओसिनेमा App तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसवर डाउनलोड करू शकता. जिओसिनेमाने प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जिओसिनेमाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नंतर सब्स्क्रिप्शन बटणावर क्लिक करा. या सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत वर्षाला ९९९ रुपये इतकी आहे. हा प्लॅन खरेदी केल्यास प्रीमियम कंटेंट तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर पाहू शकता.