Tech Layoffs 2024 : टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरूच आहे. २०२४ मध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. इंटेल, टेस्ला, मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मिळून जवळपास एक लाख ४९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टेस्ला ते इंटेल आणि सिस्को ते मायक्रोसॉफ्टपर्यंत, अनेक कंपन्यांनी पैशांची बचत करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी, बदलत्या बाजाराच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या कामगारांची संख्या कमी केली आहे. तर २०२४ मध्ये कोणत्या कंपन्यांनी किती कामगारांना काढून टाकलं हे जाणून घेऊया…
१५ हजार कर्मचारी
२०२४ मध्ये इंटेल कंपनीला अनेक तोट्यांचा सामना करावा लागला, त्यामुळे इंटेलने २०२५ पर्यंत १० अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्याची घोषणा केली, ज्यात १५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, जे सध्याच्या १,२५,००० कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्क्यांनी जास्त आहेत. कंपनी २०२६ पर्यंत दरवर्षी R&D आणि विपणन खर्च अब्जावधींनी कमी करेल आणि या वर्षी भांडवल खर्चात २० टक्क्यांपेक्षा जास्त कपात करेल. याव्यतिरिक्त ते खर्च ऑप्टिमाइझ करण्यासाठी सक्रिय प्रकल्प आणि उपकरणांचे पुनरावलोकन करेल.
२० हजारांहून अधिक कर्मचारी
टेस्लाने या वर्षी नोकऱ्या कपातीच्या दोन फेऱ्यांची घोषणा केली. सगळ्यात पहिल्यांदा १४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या सुपरचार्जिंग टीमसह आणखी शेकडो कर्मचारी कामावरून काढून टाकले. सीईओ एलॉन मस्क यांनी काल रात्री अधिकाऱ्यांना दिलेल्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, उत्कृष्ट, आवश्यक आणि विश्वासार्ह चाचणी उत्तीर्ण न होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीदेखील काढून टाकले जातील. ब्लूमबर्गने अहवाल दिला की, टेस्लाची एकूण हेडकाउंट कपात २० टक्के किंवा २० हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते.
१० हजार कर्मचारी
Cisco Systems या नेटवर्किंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीने यावर्षी दोन फेऱ्यांमध्ये नोकरकपात केली. प्रथम कंपनीने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे पाच टक्के म्हणजे चार हजार कर्मचारी फेब्रुवारीमध्ये काढून टाकले आणि नंतर पुन्हा सात टक्के नोकरपात करून सहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले. सिस्कोचे सीईओ चक रॉबिन्स म्हणाले की, कंपनीने यावर्षी AI आणि सायबरसुरक्षासारख्या उच्च वाढीच्या क्षेत्रांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
आठ हजार कर्मचारी
SAP ने आठ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. कंपनीत १,०८,००० पूर्णवेळ काम करणारे कर्मचारी आहेत. त्या व्यतिरिक्त सात टक्के जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, त्यामुळे वर्षाच्या अखेरीस त्यांची संख्या समान होईल.
सहा हजार ५०० कर्मचारी
layoffs.fyi नुसार, उबरने यावर्षी एकूण ६,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. महामारीच्या काळात राइडशेअरिंग व्यवसायात घट झाल्यामुळे कंपनीने कार्यालयेदेखील बंद केली, प्रयोगशाळा बंद केल्या आणि सेल्फ-ड्रायव्हिंग युनिट्सचे पुनर्मूल्यांकन केले.
सहा हजार कर्मचारी
डेलने सहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि वर्षाच्या उत्तरार्धातही नोकरकपात सुरू ठेवली आहे. डेलने दोन वर्षात ही दुसरी मोठी नोकरकपात केली आहे. कंपनीच्या वैयक्तिक संगणक विभागाला काही अडचणींचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे गेल्या वर्षीही ११ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये घट करण्यात आली होती. डेलने सांगितले की, खर्चाच्या चिंतेमुळे आणि पीसीमध्ये रिबाउंडमुळे २०२४ मध्ये आपले कर्मचारी कमी करणे सुरू ठेवले आहे.
पाच हजार कर्मचारी
१० मिनिटांचा व्हिडीओ कॉल (कॉल टर्मिनेशनद्वारे) करून बेल कंपनीने सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं. कंपनीने संघटनात्मक रचना सुलभ करण्यासाठी, व्यवसाय मॉडेल बदलण्यासाठी नोकर कपात करण्याचे पाऊल उचललं आहे.
तीन हजार कर्मचारी
झेरॉक्सने नवीन संस्थात्मक रचना आणि ऑपरेटिंग मॉडेल लागू करण्यासाठी १५ टक्के कर्मचारी कमी करण्याची योजना जाहीर केली. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कंपनीतून सुमारे २० हजार ५०० कर्मचारी काढून टाकले. त्यानंतर टीमची पुनर्रचना करताना यावर्षी तीन हजार कर्मचारी काढून टाकले. जागतिक व्यवसाय सेवांमध्ये कार्यक्षमता वाढवणे, आयटी, डिजिटल सेवांवर लक्ष केंद्रित करणे, नवीन मॉडेलला पाठिंबा देणे यासाठी कंपनीने आपल्या कार्यकारी टीमची पुनर्रचना केली.
दोन हजार ५०० हून अधिक कर्मचारी
मायक्रोसॉफ्टने गेमिंग विभागाची पुनर्रचना करण्यासाठी दोन हजार ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. Microsoft ने Activision Blizzard, Xbox आणि ZeniMax मधील एक हजार ९०० कर्मचाऱ्यांना काढून टाकलं, जे त्याच्या गेमिंग विभागाचे सुमारे आठ टक्के प्रतिनिधित्व करतात. त्यानंतर सप्टेंबरमध्ये कंपनीने पुन्हा ६५० कर्मचाऱ्यांची कपात केली.
दोन हजार ५०० कर्मचारी
वाढती स्पर्धा, नफ्याचा दबाव आणि विश्लेषकांच्या कमतरतेमुळे PayPal ने त्यांची कर्मचारी संख्या सुमारे नऊ टक्के कमी केली. कंपनीने २०२२ मध्ये सुमारे २९,९०० कामगारांना काढून टाकले होते. मात्र, यावेळी सुमारे दोन हजार ५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यामुळे फर्मला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास आणि फायदेशीरपणे वाढ करण्यात मदत होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
दोन हजार ५०० कर्मचारी
बायजूने या वर्षी पाच टक्के कर्मचारी म्हणजे दोन हजार ५०० कर्मचारी काढून टाकले. कारण त्यांना कर्जमुक्त व्हायचं आहे.
तर सर्व टेक कंपन्यांनी मिळून २०२४ मध्ये एकूण एक लाख ४९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे.