सध्याच्या काळामध्ये आपण सर्वच जण सोशल मीडिया वापरतो. सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन कामामधील एक अविभाज्य घटक बनले आहे. आपण सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्युब, फेसबुक आणि व्हाट्सअॅपचा वापर करतो. या सर्वच अॅप्स आपल्या वापरकर्त्यांसाठी काही ना काही नवीन फीचर्स किंवा नवीन अपडेट आणत असतात. टेलिग्रामने आपल्या वापरकर्त्यांसाठी Stories फिचर लॉन्च केले आहे. या फीचरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टेलिग्रामने अधिकृतपणे हे फिचर लॉन्च केले आहे. याबाबतची घोषणा कंपनीने सोमवारी जाहीर केले. हे फिचर सर्वात पहिल्यांदा प्रीमियम वापरकर्त्यांसाठी गेल्या महिन्यात लॉन्च केले होते. हे फिचर आता प्लॅटफॉर्मवरील प्रत्येकाला उपलब्ध असणार आहे. आजची घोषणा Telegram आपला 10 वा वाढदिवस साजरा करत असताना आली आहे. याबाबतचे वृत्त techcrunch ने दिले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! आयफोननंतर आता AirPods पण होणार मेड इन इंडिया; ‘या’ ठिकाणी सुरू होणार उत्पादन
टेलिग्रामच्या नवीन फीचरमध्ये एक घटक आहे तो अन्य प्लॅटफॉर्मच्या स्टोरीज फीचरपेक्षा वेगळे दर्शवतो. टेलिग्रामच्या या फीचरमध्ये वापरकर्त्यांची स्टोरी पोस्ट केल्यानंतर एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक आणि टिकटॉक सारख्या अन्य प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्टोरी पोस्ट केल्यानंतर एडिट करण्याचा पर्यय मिळत नाही. तिथे तुम्हाला काही बदल करायचा असल्यास स्टोरी डिलीट करावी लागते आणि मग पुन्हा पोस्ट करावी लागते.
“सोशल मीडियाच्या इतिहासात प्रथमच, तुम्ही तुमच्या कथेचा कोणताही घटक कधीही अपडेट करू शकता – त्याची दृश्यमानता, मथळा, ऑन-स्क्रीन मजकूर, स्टिकर्स किंवा इतर काहीही बदलून – ती स्क्रॅचमधून हटवू किंवा पुन्हा पोस्ट न करता, “टेलीग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले.
तुम्ही या फीचरमध्ये तुमची स्टोरी कोणी पाहायची हे ठरवू शकता. वापरकर्ते त्यांची स्टोरी किती वेळ (उदाहरणार्थ १२, २४ किंवा ४८ तास ) दिसायला हवी ते देखील ठरवू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या प्रोफाइल पेजवर स्टोरीज कायमस्वरूपी अशा प्रकारे प्रदर्शित करू शकता ज्याप्रमाणे Instagram तुम्हाला स्टोरी हायलाइट करू देते. तसेच तुम्ही तुमच्या स्टोरीजमध्ये कॅप्शन आणि लिंक जोडू शकता.