गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातून फेसबुकवरही बरीच टीका झाली. त्यानंतर फेसबुकने आपले नाव बदलून मेटा केलं. मात्र जुन्या खोड्या अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. फेअरप्ले अॅक्शन प्लान आणि रिसेट ऑस्ट्रेलियाच्या नव्या रिपोर्टमधून हा खुलासा झाला आहे. फेसबुक अजूनही विवादास्पद अल्गोरिदम वापरून मुलांचा मागोवा घेत आहे. यातून तो डेटा तयार करत असून लहान मुलांशी संबंधित जाहिराती दाखवून तो भरघोस नफाही कमवत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.
मेटा लाँच करताना त्याचे अल्गोरिदम बदलले जाईल, असं फेसबुकने आश्वासन दिले होतं. जेणेकरुन या प्लॅटफॉर्मवर मुलांचा, विशेषतः किशोरवयीन मुलांचा गैरवापर होणार नाही. मात्र फेसबुकचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अजूनही मुलांवर लक्ष ठेवत असल्याचं अहवालानुसार समोर आलं आहे. या अहवालाच्या आधारे मुलांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थांनी फेसबुकला खुले पत्र लिहून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. फेसबुकने याला उत्तर देत मुलांचा डेटा ट्रॅक करत नसल्याचं उत्तर दिलं आहे.
१८ वर्षाखालील मुलांच्या ऑनलाइन वर्तनाचा मागोवा घेण्यासाठी फेसबुक अजूनही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पाळत ठेवण्याऱ्या प्रणालीवर काम करत आहे. व्हिसलब्लोअर फ्रान्सिस होगेन यांनीही अमेरिकन संसदेत आपल्या साक्षीमध्ये फेसबुक नफा कमावण्यासाठी मुलांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. फेसबुक १८ वर्षाखालील मुलांना त्याच्या अॅपचे भविष्यातील वापरकर्ते म्हणून पाहते. या आरोपांमुळे फेसबुकला मुलांचे इंस्टाग्राम अॅप लॉन्च पुढे ढकलावे लागले आहे.