Smartphone blast : छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मनोरंजन, गेमिंग, फोटोग्राफी करण्यासाठी त्याचा भरपूर उपयोग होतो. मात्र, स्मार्टफोन वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण अलीकडेच स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याची एक घटना समोर आली आहे.
अहवालानुसार, उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे व्हिडिओ गेम खेळताना अचानक मोबाईलमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. स्फोट होण्याची ही नवीन घटना नाही. यापूर्वी देखील मोबाईलमध्ये स्फोट झालेले आहेत. अनेकदा यात फोन निर्माती कंपनीची चूक असते, तर युजरच्या गैरवापरामुळे देखील स्फोट होऊ शकतो. तुमच्यासोबत अशी घटना घडू नये यासाठी आज आम्ही तुम्हाला काही कारणे सांगणार आहोत, ज्यामुळे फोनमध्ये स्फोट होऊ शकतो.
१) चार्जिंगदरम्यान फोनचा वापर करणे
चार्जिंग करताना फोनचा वापर करण्याची सवय असेल तर लगेच सोडा, कारण असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. फोन चार्ज होत असताना गरम होतो. या दरम्यान फोनचा वापर केल्यास तो जास्त गरम होऊन त्यात स्फोट होऊ शकतो. म्हणून फोन चार्जिंगला असताना त्याचा वापर टाळा.
(SAMSUNG युजर्स सावधान, १ मिनिटांपेक्षा कमी वेळेत हॅक झाला ‘हा’ फोन, तुमच्याकडे तर नाही ना? चेक करा)
२) योग्य चार्जरचा वापर करा
फोन चार्ज करताना त्याच्यासह मिळालेल्या मूळ चार्जरचाच वापर करा. इतर चार्जरने चार्जिंग केल्यास फोनच्या बॅटरीमध्ये बिघाड होऊ शकतो आणि त्यामुळे बॅटरीमध्ये ब्लास्ट होऊ शकतो. लोकल चार्जरमध्ये पावरचा फ्लो कमी अधिक होत असतो, त्यामुळे बॅटरीवर ताण पडू शकते. म्हणून मूळ चार्जरचाच वापर करावा.
३) १०० टक्के चार्ज करणे टाळा
फोनची बॅटरी १०० टक्के चार्ज होण्यापूर्वी चार्जिंग बंद करा. कारण फोनला अधिक चार्ज केल्यास त्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यावर अधिक ताण पडू शकतो. ८५-९० टक्के चार्ज झाल्यावर फोनची चार्जिंग बंद करा. तसेच, बॅटरी पूर्ण संपवू नका. फोनमध्ये ३० टक्के बॅटरी शिल्लक राहण्यापूर्वी त्यास चार्ज करा, कारण कमी बॅटरीमध्ये फोन गरजेपेक्षा अधिक गरम होतो, जे स्फोट होण्याचे कारण ठरू शकते.
(‘IPHONE 15 ULTRA’च्या किंमतीबाबत नवा लिक, तुमच्या बजेटमध्ये बसतो का? जाणून घ्या)
४) अधिक ताणामुळे येऊ शकतात अडचणी
फोनला अधिक ताण दिल्यास अपघात होऊ शकतो. अधिक ताणामुळे फोन गरम होतो. चार्जिंगदरम्यान ओवरलोड अॅप्समुळे फोन अधिक गरम होऊन त्यात स्फोट होऊ शकतो. म्हणून फोनची मेमरी ६० ते ७० टक्के रिकमी ठेवा आणि कमी स्पेसिफिकेशन असलेल्या फोनमध्ये हेवी गेम्स खेळू नका.