चॅटिंग आणि कॉलिंगसोबतच व्हॉट्सअ‍ॅप अनेक अनोखे फीचर्स घेऊन सज्ज होत आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामुळे महिलांची मोठी चिंता दूर होणार आहे. खास महिलांच्या वापरासाठी तयार करण्यात आलेले हे फीचर आता वापरण्यासाठी तयार आहे. हे फीचर कसे काम करते आणि यामुळे महिलांना कसा फायदा होणार आहे, हे जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅपने महिलांचे हायजिन ब्रँड, सिरोनाशी हातमिळवणी केली आहे. याचा अर्थ महिलांना त्यांच्या मासिक पाळीचा मागोवा घेण्यासाठी यापुढे कोणत्याही इतर अ‍ॅपची गरज भासणार नाही. कारण आता महिलांना व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांच्या मासिक पाळीचा मागोवा घेता येणार आहे

सिरोना यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की व्हॉट्सअ‍ॅपवरील मासिक पाळी ट्रॅक करण्याच्या फीचरचे महिलांच्या दृष्टिकोनातून तीन उद्देश आहेत, एक म्हणजे मासिक पाळी ट्रॅक करणे, दुसरा गर्भधारणा आणि शेवटचा म्हणजे गर्भधारणा टाळणे. एआय आणि इंट्यूटिव्ह टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवलेले हे फिचर महिलांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Photos : Google वर ‘या’ गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात; जावं लागेल तुरुंगात

हे फिचर कसे काम करते?

जाणून घेऊया, महिला व्हॉट्सअ‍ॅपवर हे फीचर कसे वापरू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेले हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘9718866644’ हा नंबर सेव्ह करावा लागेल. सिरोनाच्या व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाउंटचा हा क्रमांक आहे. आता तुम्हाला या नंबरवर ‘हाय’ मेसेज करावा लागेल.

यानंतर तुमच्याकडे अनेक पर्याय असतील. आता तुम्हाला चॅट बॉक्समध्ये ‘पीरियड ट्रॅकर’ टाइप करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या पीरियड्सचे तपशील टाकावे लागतील. यानंतर, तुम्हाला तुमची प्रजननक्षमता, पुढील आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखा आणि तुमच्या मासिक पाळीची लांबी याबद्दल माहिती मिळेल.