सध्या सगळीकडे आर्थिक मंदीचे व कंपनीचा खर्च कमी करण्याचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. यामध्ये Amazon, google , Meta यासह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. काही कंपन्यांनी तर दोनवेळा कमर्चारी कपात केली आहे. मात्र भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही आनंदाची बातमी काय आहे हे जाणून घेऊयात.
टीसीएस कंपनी आपल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १२ ते १५ टक्के पगारवाढ दिली जाऊ शकते. टाटा समूहाच्या या कंपनीला आशा आहे की या कृतीमुळे नोकऱ्या सोडणाऱ्या किंवा बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल. सध्या, कंपनीतील अॅट्रिशन रेट २० टक्के इतका आहे. जो या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात १३ ते १४ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. तसेच कंपनी कॅम्पस रिक्रूटसाठी मूळ वेतन वाढविण्याचा विचार करत आहे.
हेही वाचा : Apple चे सीईओ टीम कुक यांनी AI बाबत केले भाष्य; म्हणाले, “आज अनेक…”
टीसीएसने असे केल्यास आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही असाच निर्णय घ्यावा लागू शकतो. IT क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या कमी होत आहे परंतु TCS ने गेल्या आर्थिक वर्षात ४४,००० कॅम्पसमधून नियुक्त्या केल्या आहेत. या वर्षी कॅम्पसमधून ४०,००० लोकांना भरती करून घेण्याची कंपनीची योजना आहे.
TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड म्हणाले, ”कंपनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १२ ते १५ टक्के पगारवाढ देण्याचा विचार करत आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना १.५% ते ८% इतकी पगारवाढ मिळू शकते.” गेल्या वर्षी, कंपनीने कनिष्ठ स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ११ टक्के बोनस दिला होता, तर वरिष्ठ स्तरावर कमी बोनस देण्यात आला होता. याशिवाय जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत कनिष्ठ अधिकाऱ्यांना १०० % बोनस देण्यात आला होता. आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने ८२१ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली होती. तर आर्थिक वर्ष २०२१-२२च्या चौथ्या तिमाहीत ही संख्या ३५,२०९ इतकी होती.
डिसेंबर तिमाहीत TCS मधील अॅट्रिशन रेट २१.३ टक्के होता. जो जानेवारी-मार्च या तिमाहीमध्ये २०.१ टक्क्यांवर आला. इन्फोसिसचा एट्रिशन रेट मार्चच्या तिमाहीत २०.९ टक्के इतका अॅट्रिशन रेट होता. जो डिसेंबर तिमाहीत २४.३ टक्के होता. विप्रो आणि HCL Technologies ने अद्याप त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेले नाहीत. विप्रो २७ एप्रिलला आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज २० एप्रिलला आपले निकाल जाहीर करणार आहेत. गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर इन्फोसिसने आपला निकाल जाहीर केला होता.