Twitter New Feature: जर तुम्ही ट्विटरवर खूप सक्रिय असाल, परंतु तुम्हाला काही ट्विट सर्वांना दाखवण्याऐवजी तुमच्या काही मित्रांना किंवा कुटुंबियांना दाखवायचे आहेत, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटरने तुमची समस्या सोडवली आहे. कंपनीने ‘ट्विटर सर्कल’ नावाने आपले फीचर लॉन्च केले आहे. या फीचर अंतर्गत यूजर्स आता प्रायव्हेट ट्विट करू शकणार आहेत. म्हणजेच त्याखाली केलेले ट्विट फक्त तुमच्या सर्कलमधील लोकांनाच दिसेल. हे संपूर्ण वैशिष्ट्य काय आहे आणि ते कसे कार्य करेल याबद्दल जाणून घेऊया…
१५० लोकांना सहभागी करू शकतात
ट्विटरने ट्विट करून हे फीचर लाँच करण्याबाबत माहिती दिली. कंपनीने त्याच्या फीचरबद्दल देखील सांगितले आहे. रिपोर्टनुसार, सध्या ट्विटर सर्कलमध्ये केवळ १५० लोकांनाच समाविष्ट केले जाऊ शकते. हे फीचर इंस्टाग्रामच्या ‘क्लोज फ्रेंड्स’ फीचरसारखे आहे. १५० लोकांच्या सर्कलमध्ये कोण असेल हे ठरवण्याचा सर्व अधिकार तुम्हाला असेल. तसंच, जेव्हा कोणी तुम्हाला ट्विटर सर्कल मधून जोडेल किंवा काढून टाकेल, तेव्हा तुम्हाला याबद्दलची सूचना मिळणार नाही.
( हे ही वाचा: Redmi 11 Prime 5G फोन भारतात ६ सप्टेंबरला होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..)
फिचरमध्ये आणखी काही खास आहे
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सना सर्कल मधून बाहेर पडण्याची परवानगी देखील दिली जाणार नाही. जर वापरकर्त्यांना सर्कलचा भाग व्हायचे नसेल, तर ते सर्कल तयार करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करू शकतात. असे केल्याने तो सर्कलमधून बाहेर जाईल. या फीचरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्कलात केलेले ट्विट हिरव्या बॅजच्या आत दिसतील. हे ट्विट कोणीही रिट्विट किंवा शेअर करू शकणार नाही. या ट्विटवर दिलेले सर्व प्रत्युत्तरे खाजगी राहतील. कंपनी मे महिन्यापासून या फीचरची चाचणी करत होती. आता ते जागतिक स्तरावर सुरू करण्यात आले आहे. गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून हे फिचर महत्त्वाचे मानले जात आहे.