ट्विटरच्या खासगी धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. व्यक्तीच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येणार नाहीत. कंपनीने आपल्या खासगी धोरणात बदल करत त्यात खासगी फोटो आणि व्हिडिओ यांचा समावेश केला आहे. आतापर्यंत कोणताही युजर्स दुसऱ्या युजर्सचे व्हिडिओ आणि फोटो त्याच्या परवानगीशिवाय पाठवू शकत होता. मात्र आता तसं करता येणार नाही. नव्या नियमाचा मुख्य उद्देश छळविरोधी धोरण अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्संना सुरक्षा देणं हा आहे.
“खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचं संभाव्य उल्लंघन होऊ शकतं. त्यामुळे भावनिक आणि शारीरिक हानी देखील होऊ शकते.”, असं ट्विटरने सांगितलं आहे. “गैरवापर केल्याने खासगी आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. खासकरून महिला आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.”, असंही कंपनीने म्हटलं आहे. ट्विटरचा हा नियम पब्लिक फीगर नसलेल्या व्यक्तींसाठीच आहे. मात्र पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तींना ही सुविधा मिळणार नाही असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. यापूर्वी ट्विटरने युजर्संना इतरांची वैयक्तिक माहिती जसे की त्यांचा पत्ता किंवा स्थान, ओळख दस्तऐवज, गैर-सार्वजनिक संपर्क माहिती, आर्थिक माहिती किंवा वैद्यकीय डेटा शेअर करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A१३ चे स्पेसिफिकेशन लीक, जाणून घ्या कसे असतील फीचर्स
दरम्यान, ट्वीटरचे सह संख्यापक जॅक डॉर्सी यांनी सीईओपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पराग आयआयटी मुंबई आणि स्टॅनफॉर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. पराग अग्रवाल २०११ पासून ट्विटरसोबत काम करत आहेत. २०१७ पासून ते कंपनीच्या सीटीओ पदावर होते.