जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क हे ट्वीटर कंपनीचे मालक झाल्यापासून घडामोडींना वेग आला आहे. मस्क यांनी कंपनीमधून ५० टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र मस्क यांनी यासंदर्भातील घोषणा केल्यानंतर काही वेळातच जगभरातील अनेक भागांमध्ये ट्वीटरची सेवा विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. ट्वीटर मोबाईलवर व्यवस्थित काम करत असलं तरी ट्वीटर वेबवर बऱ्याच तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेकांना ट्वीटरवर पोस्ट करण्यात, रिफ्रेशन करण्यात अडचणी येत आहे. “Something went wrong, but don’t fret — let’s give it another shot,” असा मेसेज अनेकांनी दिसत आहे. एका तासाहून अधिक काळ अनेकांना या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र अनेकांनी या तांत्रिक अडचणींचा संदर्भ आता कर्मचारी कपातीच्या इशाऱ्याशी जोडण्यास सुरुवात केली आहे.
जगभरातील वेगवेगळ्या वेबसाइट्सवरील तांत्रिक अडचणींवर लक्ष ठेऊन असलेल्या ‘डाऊन डिडेक्टर’वर अनेकांनी ट्वीटर रिफ्रेश होत नसल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी ट्वीटर वेबवरुन लॉगइन करताना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. वेबसाईटवर अनेकांना लॉगइन एरर दाखवत आहेत.
‘डाऊन डिडेक्टर’च्या आकडेवारीनुसार ९४ टक्के लोकांनी ट्वीटर वेबवर लॉगइनला अडचणी येत असल्याचं म्हटलं आहे. तर सहा टक्के लोकांना मोबाईलवरुन ट्वीटर पाहण्यात अडचणी येत आहेत. मात्र भारतामध्ये अनेक ठिकाणी आयओएस आणि अॅण्ड्रॉइडवर ट्वीटर व्यवस्थित काम करत असलं तरी ट्वीटर वेबवर अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. या पेजवर केवळ एररचा मेसेज दाखवला जात आहे.
एलॉन मस्क यांनी काही तासांपूर्वीच कंपनीमधील कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचे संकेत दिले होते. कंपनीतील जवळजवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं आहे की नाही, याबाबत ट्वीटरकडून ईमेलद्वारे आज कर्मचाऱ्यांना कळवण्यात येणार आहे, असं वृत्त ‘सीएनएन’नं दिलं आहे. “ट्वीटरला भक्कम स्थितीत आणण्यासाठी आम्ही नोकरकपातीच्या कठीण निर्णय आज आम्ही घेत आहोत”, असा ईमेल कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवल्याचं वृत्त ‘रॉयटर्स’नं दिलं आहे. या प्रक्रियेदरम्यान कार्यालयं तात्पुरती बंद राहणार आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांचे बॅजही काही काळासाठी निषक्रिय करण्यात येणार आहे, असाही उल्लेख या ईमेलमध्ये आहे. कर्मचारी, ट्वीटरच्या यंत्रणांसह ग्राहकांच्या मजकुराच्या सुरक्षेसाठी हे करण्यात येत असल्याचं ट्वीटरकडून सांगण्यात आलं आहे.