एलॉन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीमध्ये अतिशय वेगात घडामोडींना सुरुवात झाली आहे. सुरुवातीस त्यांनी सीइओ पराग अग्रवाल यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला. एवढ्यावर न थांबता त्यानंतर त्यांनी सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. पण हे गंडांतर आता ट्विटरच्या कर्मचाऱ्यांवर येणार हे काल म्हणजेच गुरुवारी (३ नोव्हेंबर) रोजी स्पष्ट झाल्यानंतर ट्विटरच्या कर्मचारी वर्गाची झोपच उडाली आहे.

आणखी वाचा : Twitter Down : एलॉन मस्क यांचा कर्मचारी कपातीचा इशारा Twitter च्याच अंगाशी आला? अनेक ठिकाणी सेवा ठप्प

ट्विटरचा किमान अर्धा कर्मचारी वर्ग थेट घरी पाठवण्याचा निर्णय मस्क यांनी आता घेतला असून त्यामुळेच कर्मचारी हैराण झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी तर थेट ‘लॉग आऊट’च केल्याने ट्विटरच्या व्यवहारांना जगभरात फटका बसला आणि ट्विटरचे इंजिन थंडावले, अशी चर्चा आहे. या कर्मचारी कपातीच्या संदर्भातील काही माहिती बाहेर आली आहे, त्यानुसार आज ४ नोव्हेंबर रोजी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना इ-मेलच्या माध्यमातून त्यांच्या नोकरीच्या सद्यस्थितीविषयी कळविले जाणार आहे. त्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ९ आणि तेथील प्रमाण वेळेनुसार सकाळचे नऊ ही वेळ मुक्रर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी भारतीय वेळेनुसार रात्रीचे नऊ केव्हा वाजतात याची वाट पाहात आहेत.

आणखी वाचा : Telegram वर मेसेज शेड्युल करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या स्टेप्स

‘ट्विटरमधील तुमची जबाबदारी’ या शीर्षकाखाली हे मेल येणार अशी चर्चा आहे. ट्विटरची कर्मचारी संख्या साडेसात हजार असून ही संख्या थेट साडेतीन हजारावर आणण्याचा मस्क यांचा मानस आहे. ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच एक ‘मेमो’ मेलवर आला असून त्यात ही कार्यवाही ‘दुर्दैवी पण आवश्यक’ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आवश्यकतेपेक्षा दुप्पट कर्मचारीवर्ग असल्याचे या मेमोमध्ये म्हटले आहे. ट्विटरच्या वाढीसाठी म्हणूनच कर्मचारी कपात हा महत्त्वाचा मार्ग आहे, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये ट्विटरचा निव्वळ तोटा २७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर गेल्याचा उल्लेख यात आहे. ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना भरपाई म्हणून काही ठोक रक्कम देण्यात येणार आहे. मात्र त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्याचीही किंमत अदा करण्याची वेळ आली तर मात्र मस्क यांच्या अधिग्रहण मूल्यामध्ये याचीही भर पडेल आणि रक्कम वाढेल, असे चित्र आहे.

Story img Loader