तुमच्या ट्विटर अकाऊंटला अचानक फॉलोअर्सची संख्या कमी झालीये का? भारतातील अनेक ट्विटर युजर्सनी गुरुवारी रात्री आपले फॉलोअर्स अचानक कमी झाल्याचं ट्विट करत आश्चर्य व्यक्त करण्यास सुरुवात केली. महत्वाचं म्हणजे, अनेक ट्विटर युजर्सचे फॉलोअर्स जवळपास शेकडो ते हजारोंनी कमी झाले आहेत. यासंबंधी अनेकांनी ट्वीट करत तक्रार केली आहे. यासंबंधी ट्विटरने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पण चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण फॉलोअर्स कमी झालेले तुम्ही एकटे नाही. जाणून घ्या यामागचं नेमकं कारण काय आहे.

नेमकं झालंय काय?

सध्याच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी समस्या राहिलेल्या बॉट्सपासून सुटका करुन घेण्यासाठी ट्विटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी क्लीन अप मोहीम राबवत असतात. ट्विटरवरील फॉलोअर्स कमी होणं हा त्याचाच एक भाग आहे. पण म्हणजे नेमकं काय करत आहेत हे समजून घेऊयात.

बॉट्स आणि बनावट फॉलोअर्सना ट्विवटर कशा पद्दतीने हाताळतं?

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पासवर्ड आणि फोन नंबरसारख्या माहितीची खातरजमा करण्यासाठी वेळोवेळी अकाऊंट्सची तपासणी करत असतं. जोपर्यंत अकाऊंटकडून या माहितीला दुजोरा दिला जात नाही तोवर ट्विटर ते अकाऊंट फॉलोअर्सच्या यादीत टाकत नाही. कोणत्याही पद्धतीची फसवणूक थांबवण्यासाठी कंपनीकडून वारंवार ही प्रक्रिया राबवली जाते.

याआधीही ट्विटरने जून महिन्यात अशाच पद्दतीने ही प्रक्रिया राबवली होती. यावेळी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी काही दिवसांत ८० हजार फॉलोअर्स कमी झाल्याचं ट्वीट केलं होतं.

त्यावेळी ट्विटरने त्यांना उत्तर देत, “वेळोवळी तुम्हाली ही तफावत दिसेल. ज्या अकाऊंट्सना आम्ही त्यांचे पासवर्ड आणि फोन नंबरची खात्री करण्यास सांगितलं आहे ते जोपर्यंत त्याला दुजोरा देत नाही तोपर्यंत ते फॉलोअर्सच्या यादीत जोडले जाणार नाहीत,” असं स्पष्ट केलं होतं.

मात्र ट्विटर फॉलोअर्स कमी झाल्याने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला होता.

तुमचेही ट्विटर फॉलोअर्स कमी झाले असतील तर चिंता करु नका. त्यांनी आपली माहिती योग्य असल्याचं सांगितल्यानंतर ते पुन्हा तुमच्याशी जोडले जातील.

Story img Loader