मायक्रोब्लॉगिंग साईट असणाऱ्या Twitter ने सर्व वापरकर्ते आणि संस्थांच्या अकाऊंटवरून लीगसी व्हेइरिफिकेशन Blue Tick हटवली आहे. आता फक्त ‘ट्विटर ब्लू’ साठी पेड सब्स्क्रिप्शन घेणाऱ्याच वापरकर्त्यांना त्यांच्या प्रोफाईलवर व्हेरिफिकेशन ‘ब्लू टिक’ मार्क यापुढे दिसणार आहे. मात्र हे पाऊल ट्विटरने अचानकपणे घेतलेले नाही. या आधी याबद्दल ट्विटरकडून वापरकर्त्यांना सूचना देण्यात येत होत्या. ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतले नसेल त्यांच्या प्रोफाईलवर ब्लू टीक दिसणार नाही.
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी ब्लू टिक हटवण्यासंदर्भात अंतिम तारीख देखील काही दिवसांपूर्वी ट्विट करत सांगितली होती. २० एप्रिल पासून म्हणजेच आजपासून ब्लू टिक हटवली जाणार आहे. त्याप्रमाणे ट्विटरने आजपासून ब्लू टिक हटवली आहे. ट्विटरने हटवलेल्या ब्लू टिक मध्ये अनेक मोठे राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. ज्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे.
ब्लू टिकसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
Twitter Blue ची किंमत ही प्रत्येक ठिकाणानुसार बदलत असते आणि तुम्ही कसे साइन अप करता यावर अवलंबून असते. भारतातातील वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू साठी दर महिन्याला ६५० रुपये आणि Android आणि iOS वापरकर्त्यांना दर महिन्याला ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार, सरकारी अधिकारी आणि सामान्य लोकांना यापूर्वी मोफत ब्लु टिक मिळत होती त्यासाठी त्यांना आता पैसे मोजावे लागणार आहेत.
अनेक राजकारणी आणि कलाकारांची ब्लू टिक झाली गायब
बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या अकाऊंटवरून आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. त्यामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, दीपिका पादूकोन , रणबीर सिंह अशा अनेक नावांचा समावेश आहे. अनेक राजकारण्यांच्या ब्लू टिक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी, अरविंद केजरिवाल यांसारख्या राजकारण्यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच या निर्णयाचा फटका काही खेळाडूंना देखील बसला आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली यांनीही त्यांच्या व्हेरीफाईड ब्लू टिक्स गमावल्या आहेत. रोनाल्डोचे ट्विटरवर १०० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र त्याची ब्लू टिक देखील आता हटवण्यात आली आहे.
ट्विटरने हे पाऊल उचलल्यामुळे वापरकर्त्यांना महिन्याला पैसे भरावे लागणार आहेत. सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी काही खास फीचर्स देखील देणार आहे. यामध्ये जाहिराती दिसण्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच ट्विट पोस्ट करण्याआधी लिहिण्यासाठी अधिक शब्द वापरता येणार आहेत. तसेच तुम्हाला ट्विट एडिट देखील करता येणार आहे. या फीचर्ससह व्हेरीफाईड अकाउंट्ससाठी कंपनी अजूनही काही फीचर्स देऊ शकते.