आजकाल अनेक जण उबर आणि ओलाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. कारण- रिक्षा किंवा इतर वाहनांच्या तुलनेत ओला वा उबरने प्रवास करणे थोडे सोपे असते. कारण- तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा या कार ऑनलाइन बुकिंग करू शकता आणि तुमच्या वेळेनुसार त्या तुम्हाला न्यायलाही येतात. उबर आणि ओलाचा प्रवास सुरक्षित मानला जातो. मात्र, कधी कधी ऑनलाइन ठरलेल्या किमतीपेक्षा या उबर, ओलाचे चालक ग्राहकांकडून जास्त पैसे मागताना दिसतात.
तर ‘राइड-हेलिंग जायंट’ या समस्येवर उपाय म्हणून प्रयोग करीत आहे. ‘टेकक्रंच’च्या अहवालानुसार, उबर कंपनी ‘उबर फ्लेक्स’ (Uber Flex) विकसित करीत आहे. हे एक नवीन फीचर असेल; जे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार राइडचे भाडे निवडण्याची परवानगी देईल. उबरने ‘उबर फ्लेक्स’ फीचरची चाचणी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये औरंगाबाद, अजमेर, बरेली, चंदीगड, डेहराडून, ग्वाल्हेर, इंदूर, जोधपूर व सुरत या भारतीय शहरांमध्ये सुरू केली. तसेच सध्या भारतातील काही दोन व तीन मार्केटमध्ये या फीचरवर प्रयोग केला जात आहे.
हेही वाचा… Amazon Sale 2024: ॲमेझॉनच्या आगामी सेलमध्ये ‘या’ वस्तूंवर असणार भरघोस सूट; जाणून घ्या ऑफर्स
‘उबर फ्लेक्स’ कसे काम करणार?
उबर फ्लेक्स ग्राहकांना नेहमीच्या भाड्याऐवजी नऊ विविध प्रकारच्या भाड्याचे पर्याय देईल. त्यामधून ग्राहकाने निवडलेला भाड्याचा एक पर्याय डीफॉल्ट (Default) किंवा प्रारंभिक (Initial) भाडे म्हणून सेट केले जाईल. तसेच जेव्हा एखादा चालक हे विशिष्ट भाडे स्वीकारेल तेव्हा ते भाडे तो जवळपासच्या चालकासोबतही शेअर करू शकतो. परंतु, ग्राहकाने निवडलेला भाड्याचा पर्याय चालकांना स्वीकारण्याची वा तो नाकारण्याची पूर्णपणे मुभा असणार आहे. जर चालकाने ग्राहकाने ठरवलेल्या भाड्याच्या पर्यायाला सहमती दिली, तरच तो ती राइड स्वीकारेल आणि त्या विशिष्ट भाड्यात सेवा प्रदान करील. मात्र, जर चालकाला तो पर्याय मान्य नसेल, तर त्यांना राइड नाकारण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
चालक ग्राहकांबरोबर ठरलेले भाडे घेण्यास नकार देतात हे लक्षात घेऊन ही योजना प्रामुख्याने आखण्यात आली आहे. उबरची प्रामुख्याने उबर गो (Uber Go) ही सेवा ठरावीक भागातील शहरांमध्ये एक स्वस्त ट्रिपसाठी देण्यात येणार आहे. कधी कधी या प्रीमियर राइड्स आणि ऑटोरिक्षासाठीही ऑफर केल्या जातात. तुम्ही या चालकांना पैसे किंवा डिजिटल पेमेंटद्वारेही पैसे देऊ शकता. उबर आपल्या उबर फ्लेक्स या फीचरची लेबनॉन, केनिया लॅटिन अमेरिका आदी देशांमध्ये चाचणी करीत आहे. TechCrunch च्या मते, उबरने लवकरच दिल्ली व मुंबईसारख्या भारतातील प्रमुख शहरांमध्ये काम करण्याचा हा नवीन मार्ग वापरण्याची योजना आखली आहे.