सध्या डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेआहे. आपण ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून UPI व्यवहार महाग होणार आहेत. तुम्ही २,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक परिपत्रक जारी केले आहे. काही वेळातच या परिपत्रकाबाबत NPCI ने स्पष्टीकरण दिले आहे.
NPCI ने UPI पेमेंटवर चार्जेस आकारल्याचे वृत्त नाकारले आहे. NPCI ने म्हटले आहे की,UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. NPCI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्वाधिक ९९.९ टक्के UPI व्यवहार फक्त बँक खात्यांद्वारे केले जातात.
NPCI ने सांगितले की बँक किंवा ग्राहकांना UPI पेमेंटसाठी कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत. तसेच, UPI व्यवहार एका बँकेतून दुसऱ्या बँकेत केला गेला तरी वापरकर्त्यांना कोणतेही चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI Wallets) आता इंटरऑपरेबल UPI इकोसिस्टमचा भाग आहेत. हे लक्षात घेऊन, NPCI ने PPI वॉलेट्सना इंटरऑपरेबल UPI इकोसिस्टमचा एक भाग होण्यासाठी परवानगी दिली आहे. इंटरचेंज चार्ज फक्त PPI मर्चंट ट्रान्झॅक्शन्स (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स मर्चंट ट्रान्झॅक्शन्स) वर लागू होणार आहे.यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
NPCI च्या परिपत्रकानुसार, Google Pay, Paytm, PhonePe किंवा इतर अॅप्सद्वारे केलेल्या पेमेंटवर १.१ टक्क्यांपर्यंत इंटरचेंज चार्ज भरावा लागणार होता. मात्र त्याबाबत NPCI स्पष्टीकरण दिले आहे. तसेच पेटीएमनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
काय होते परिपत्रक ?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच एक परिपत्रक जारी केले होते, ज्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्यास सांगितले होते. परिपत्रकानुसार २,००० रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर १.१ टक्के शुल्क भरावे लागणार होते. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागेल असे परिपत्रकामध्ये सांगण्यात आले होते.