UPI Payments Two Biggest Changes RBI announced : अलीकडच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. सध्या गूगल पे, फोन पे आणि यूपीआय ॲपच्या मदतीने कुठेही आणि कधीही सहज पेमेंट करण्यास मदत होते. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर काही सेकंदांत रिचार्ज करणे, वीजबिल भरणे, पॉलिसीचे पैसे भरणे, पैसे पाठवणे, रिसिव्ह करणे शक्य झालं आहे. तर आता यूपीआयमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत, ज्याच्या मदतीने ऑनलाइन व्यवहार करणे आणखीन सोपे होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या आठवड्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रणालीमध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. यामध्ये UPI द्वारे कर भरण्याच्या मर्यादेत वाढ आणि डेलिगेटेड पेमेंट फीचरचा समावेश आहे.
UPI द्वारे कर भरण्याच्या मर्यादेत वाढ :
सगळ्यात पहिला बदल म्हणजे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यूपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा वाढवली आहे. आतापर्यंत ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत होती, जी आता पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.यूपीआयद्वारे कर भरणाऱ्यांना प्रति व्यवहार एक लाख ते पाच लाखांपर्यंत फायदा होईल. या पाचपट वाढीमुळे डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणात कर भरणाऱ्यांची प्रक्रिया सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवड्यात चलनविषयक धोरण समितीच्या ५० व्या बैठकीत हा निर्णय जाहीर करताना असे सांगितले होते.
डेलिगेटेड पेमेंट फीचर :
दुसरा मोठा बदल म्हणजे UPI मध्ये नवीन “डेलिगेटेड पेमेंट्स” फीचर. या फीचरच्या मदतीने एक बँक खातेदार आपल्या कुटुंबातील दुसऱ्या वापरकर्त्याला त्याच्या बँक खात्यातून व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकणार आहे. यामुळे दुसऱ्या वापरकर्त्याला UPI शी लिंक केलेले वेगळे बँक खाते उघडण्याची गरज भासणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आता नव्याने मिळणाऱ्या सुविधेद्वारे बँक खातेधारकाने आपला एक्सेस कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला दिल्यास तो वैध असणार आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. हे फीचर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या लोकांसाठी उपयोगी ठरेल; ज्यांची स्वतःची बँक खाती UPI शी लिंक केलेली नाहीयेत.