एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी एका जंगी पार्टी दिली, त्यानंतर काही दिवसांनी याच कर्मचाऱ्यांपैकी काहींना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. कंपनीने सुमारे १३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत. यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
टेकक्रंचच्या अहवालानुसार, अमेरिकेमधील सायबर फर्म बिशप फॉक्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक ग्रँड पार्टी दिल्यानंतर काही दिवसांनी नोकर कपातीची घोषणा केली. कंपनीने १३ टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड पडली आहे. २ मे रोजी कर्मचारी कपातीच्या निर्णयापूर्वी कंपनीत सुमारे ४०० कर्मचारी होते.
बिशप फॉक्स कंपनीचा हा निर्णय सायबर सुरक्षा परिषद RSA मध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी आला आहे. या कॉन्फरन्समध्ये कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पार्टी दिली. ज्यामध्ये ब्रँडेड दारु, खाण्यासाठी चांगला मेन्यू दिला होता. कंपनीने आरएसए पार्टीवर एकूण किती खर्च केला हे जाहीर करण्यास नकार दिला आहे.
एप्रिलच्या शेवटी अनेक कर्मचाऱ्यांनी पार्टीचे फोटो ट्वविटरवर शेअर केले आणि त्यांनी पार्टीचा कसा आनंद लुटला हे सांगितले, पण काही दिवसांनी त्यांच्यापैकी काहींनी कंपनीतील कर्मचारी कपात उघड केली.
बिशप फॉक्सच्या कर्मचार्यांना जराही कल्पनाही नव्हती की, कंपनीने कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता नोकरी गेल्याने बेरोजगार झालेले काही कर्मचारी सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत आहेत. एका कर्मचाऱ्याने म्हटले की, कंपनीने अनपेक्षित पाऊल उचलले आहे. सर्वांना आनंदाने पार्टी दिली, मग अचानक कंपनीने नोकर कपातीचा बॉम्ब फोडला. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. यापैकी एका कर्मचाऱ्यांने म्हटले की, अंतर्गत पुनर्रचनेमुळे हे झाले आहे.
बिशप फॉक्सचे प्रवक्ते केविन कोश यांनी पार्टीच्या संदर्भात ईमेलमध्ये म्हटले आहे की, आरएसए कार्यक्रम अनेक महिने आधीच बुक केला होता. आगामी काळात असे आणखी काही कार्यक्रम आयोजित केले जातील. तर यावर कंपनीचे सीईओ विनी लियू म्हणाले की, जागतिक आर्थिक परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी आणि आमचा व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी आम्ही हे बदल केले आहेत. सध्या आमचा व्यवसाय स्थिर असून त्यात वाढ होत आहे. पण बाजारातील अनिश्चितता आणि गुंतवणुकीचा कल याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.