टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क सतत चर्चेत असतात. ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर, सर्वत्र खळबळ माजली. यानंतर लगेचच मस्क यांनी ट्विटरच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना आणि संचालक मंडळाला काढून टाकले. इतकेच नाही तर आता जगभरातील ५० टक्के कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. तसेच यापुढे ट्विटरवरील ब्लु टिकसाठी वापरकर्त्यांना ८ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६५० रुपये भरावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक ट्विटर युजर्सनी आपले अकाउंट बंद केले आहे. तर काहीजण ते लवकरच बंद करणार आहेत.
ट्विटरमधून अनेक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होण्याच्या पार्श्वभूमीवर येथील कर्मचाऱ्यांवरील कामाचा तणाव अनेकपटींनी वाढलेला पाहायला मिळत आहे. अशातच आणखी एक बातमी चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक गुगलवर ‘ट्विटर अकाउंट कसे डिलीट करावे?’ याबाबत सर्च करत आहेत.
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ४४ डॉलर्समध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली. एप्रिलमध्ये यासंबंधी घोषणा करण्यात आली होती. यानंतर २७ ऑक्टोबरला अधिकृतरित्या ट्विटरचा ताबा मिळवताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या अहवालानुसार, इलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर गुगलवर ‘ट्विटर अकाउंट कसे डिलीट करावे?’ याच्या सर्चमध्ये ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्हीपीएन ओव्हरव्ह्यूने खुलासा केला आहे की हे आकडे २४ ते ३१ ऑक्टोबर या दिवसांमधील आहेत. इतकंच नाही तर गुगल ट्रेंड्सच्या आकडेवारीनुसार या कालावधीत ‘ट्विटर बॉयकॉट’च्या सर्चमध्ये ४,८०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
बाळाला कडेवर घेऊन भाषण केलं म्हणून महिला आयएएस अधिकारी ट्रोल; पतीने दिलेलं उत्तर जिंकेल तुमचं मन
ट्विटर या सोशल मीडिया कंपनीमधील कर्मचाऱ्यांची छाटणी शुक्रवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या अहवालानुसार, ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना या छाटणीबाबत मेलच्या माध्यमातून सूचित करण्यात आले होते. तसेच, त्यांना असेही निर्देश देण्यात आले होते की शुक्रवारी कर्मचाऱ्यांची छाटणी होणार असल्याने त्यांनी घरीच राहावे आणि शुक्रवारी कार्यालयात येऊ नये.