देशातील सर्वांत मोठी दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी व्होडाफोन-आयडिया (व्ही) त्यांच्या ग्राहकांना नवनवीन रिचार्ज प्लॅन, काही खास ऑफर्स नेहमीच देत असते. पण, आता ही कंपनी शालेय विद्यार्थ्यांसाठीही काही विशेष उपक्रम घेऊन आली आहे. VI ने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ‘विंटर कॅम्प’ शिबिर सुरू केले आहे. हे शिबिर शालेय विद्यार्थ्यांना मजा-मस्ती करीत अनोख्या गोष्टी शिकण्यास, त्यांना व्यग्र ठेवून, त्यांची वैचारिक क्षमता वाढवण्याच्या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आले आहे.
व्ही फाउंडेशनचे हे ४ जानेवारीपासून सुरू झालेले गुरुशाळा ऑनलाइन हिवाळी शिबिर १० जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजेच आणखीन तीन दिवस विद्यार्थी या शिबिराचा आनंद घेऊ शकणारआहेत. इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११.३० ते १२.३० आणि संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान दोन स्लॉटमध्ये हे शिबिर असेल. उर्वरित तीन दिवसांमध्ये शिबिरात देशातील सर्व विद्यार्थी भाग घेऊ शकतात. तसेच हे शिबिर विनाशुल्कसुद्धा असणार आहे.
या शिबिरात तज्ज्ञांद्वारे आयोजित केलेली मजेशीर आणि संवादात्मक सेशन्स (Sessions) घेतली जात आहेत; ज्यात विद्यार्थी खेळ आणि सराव सेशनद्वारे इंग्रजी शिकू शकतात. तसेच यादरम्यान एक थिएटर सेशन असेल. त्यात विद्यार्थी सुरक्षित आणि विश्वासू वातावरणात त्यांची मत किंवा भावना व्यक्त करण्यासाठी आत्मविश्वास मिळवू शकतात.
हेही वाचा…अरे व्वा! आता ग्राहकांना सोईनुसार निवडता येणार Uber ची राइड…
तसेच या शिबिरातील ‘फन विथ फिटनेस’ (Fun With Fitness) या फिटनेस सेशनमध्ये डान्स, झुंबा व योगा यांसारख्या क्रियाकलापांचा समावेश आहे; ज्यामुळे विद्यार्थ्यांना सक्रिय राहण्यास मदत होईल. त्यानंतर ‘कबाड से जुगाड’ म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना जुने वर्तमानपात्र, बांगड्या, प्लास्टिक बाटली, लोकर आदी टाकाऊ वस्तूंचा कशा प्रकारे पुनर्वापर करायचा यांचे शिक्षण, तसेच हँगिंग डेकोरेशन, कोस्टर, बुकमार्क, फोटो फ्रेम्स यांसारखे क्रिएटिव्ह साहित्य बनवण्याचेही यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गुरुशाळा हिवाळी शिबिराच्या शेवटी वरील थीम्स आणि सामान्य जागरूकतेसंबंधीच्या अतिरिक्त विषयांवर निवडक विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांमधूनच विजेते घोषित करून, त्यांना बक्षिसे प्रदान केली जातील. त्यानंतर शिबिराचा समारोप होईल. एकूणच अशा प्रकारे हे खास शिबिर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.