वोडाफोन-आयडिया (Vi) भारतातील सर्वांत मोठी तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅन लॉंच करीत असते. कंपनीकडे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत; ज्यात ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही वोडाफोन-आयडिया म्हणजेच व्हीआय वापरकर्ते आहात आणि बऱ्याच दिवसांपासून नेटवर्कच्या समस्येला कंटाळले असाल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
लवकरच व्हीआय (VI) वापरकर्त्यांना ५जी नेटवर्कचा अनुभव घेता येणार आहे. वोडाफोन आयडियाकडून पुढील सहा ते सात महिन्यांत ५जी सेवा सुरू केली जाणार आहे. ५जी कंपन्यांच्या यादीत जिओ व एअरटेलनंतर आता वोडाफोन आयडिया या कंपनीचे नावसुद्धा जोडले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धात्मक दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. कारण- प्रतिस्पर्ध्यांनी म्हणजेच एअरटेल व जिओने आधीच देशभरात ५जी सेवा देऊ केल्या आहेत.
हेही वाचा…इन्स्टाग्राम तुमचे अकाउंट ‘फ्लिपसाइड’ फीचरमध्ये बदलणार; पाहा काय होणार बदल
व्हीआयचे मुख्य कार्यकारी अक्षया मुंद्रा यांनी कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या कॉलदरम्यान ही घोषणा केली होती. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार व्हीआयने आपल्या सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत; ज्यात ३जी सेवा महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मुंबई व कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बंद करणार आहे. कंपनी इतर शहरांमध्ये ३जी सेवा टप्प्याटप्प्याने बंद करील आणि आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत तिचे ३जी नेटवर्क पूर्णपणे बंद होऊन जाईल.
तसेच काही दिवसांपूर्वीच एअरटेल व रिलायन्स जिओने ५जी प्लॅनच्या किमती जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता या तिन्ही कंपन्यांमध्ये ५जी नेटवर्कची स्पर्धा रंगणार आहे. तसेच या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी कोणत्या किमतीत ५जी रिचार्ज प्लॅन्स घेऊन येत आहे हे पाहणे रंजक ठरणार आहे.