Gaganyaan Astronaut: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतीच चांद्रयान-२ मोहीम यशस्वी करून दाखविली. त्यानंतर महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेची घोषणा झाली. तसेच नजीकच्या काळात इस्रोकडून अंतराळवीरही अंतराळात पाठविले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वी चार अंतराळवीरांचा सर्व देशाला परिचय करून दिला होता. या पार्श्वभूमीवर आता इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीर बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी कोणते कौशल्य असले पाहिजेत? तसेच त्यांनी कोणत्या निकषांची पूर्तता करायला हवी? याबाबतची तपशीलवार माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एस. सोमनाथ म्हणाले की, अंतराळवीर होण्यासाठी हवाई दलाच्या कुशल वैमानिकांना प्राधान्य देण्यात येत आहे. उत्तम अंतराळवीर होण्यासाठी अनेक गुणांचे उत्तम मिश्रण असणे आवश्यक आहे. गगनयान अंतराळवीरांबाबत माहिती देताना ते म्हणाले की, अंतराळवीर होण्यासाठी सर्वात आधी संबंधित उमेदवार कुशल वैमानिक असणे आवश्यक आहे. हे वैमानिक नव्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याबरोबरच कोणतेही हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमान उडविण्याची क्षमता असणारे हवेत.

हे वाचा >> गगनयान मोहिमेसाठी इस्रोने निवड केलेले चार अंतराळवीर कोण आहेत? ही निवड नेमकी कशी करण्यात आली?

अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण घेत असताना एका वेगळ्याच जगाचा परिचय होत असतो. त्यामुळे उमेदवार एका सैनिकाच्या भूमिकेतून पुन्हा विद्यार्थीदशेत येतो. अंतराळवीराला सतत नव्या गोष्टी शिकत राहण्याची सवय करून घ्यावी लागते, असेही एस. सोमनाथ म्हणाले.

गगनयान अंतराळवीर होण्यासाठी काय करायला हवे?

एक चांगला अंतराळवीर होण्यासाठी तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक चपळता यांचे उत्तम मिश्रण असणे गरजेचे आहे. अंतराळवीरांना अभियांत्रिकी, गणित, अंतराळ विज्ञान आणि मेकॅनिक यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. असे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना नंतर इस्रोसाठी आवश्यक असलेल्या प्रगत ज्ञानाची माहिती करून दिली जाईल. त्यामुळे हे उमेदवार इस्रोच्या शास्त्रज्ञाइतके सक्षम होतील.

गगनयान या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा झालेली आहे. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चौघांच्या नावांची मागेच घोषणा झाली असून अंतराळवीरांची भारताची ही पहिलीच तुकडी आहे. चारही जणांकडे प्रशिक्षित वैमानिक म्हणून अनुभव आहे, ज्यामुळे त्यांची निवड गगनयान मोहिमेसाठी योग्य मानली जात आहे.

हे ही वाचा >> भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी पोहचणार? इस्रोचे अध्यक्ष स्पष्टच म्हणाले “त्यासाठी सातत्याने…”

यशस्वी भारतीय अंतराळ मोहीम

अंतराळ क्षेत्रात भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. २०२३ च्या चांद्रयान-२ मोहिमेने तर इतिहास रचला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश झाल्याने जगाच्या इतिहासात भारताने आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे. यानंतरच्या सूर्य मोहिमेत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आदित्य-एल १ लाँच केले. भारताचे आदित्य-एल १ सूर्याच्या कक्षेत असून, सौर यंत्रणेवर लक्ष केंद्रित करून आहे. भारताने २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याची आणि २०४० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची नवीन योजनाही जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What do you need to become a gaganyaan astronaut isro chief s somanath gives answers kvg