What Is Call Merging Scam: गेल्या काही वर्षांत भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार सतत फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धीत अवलंबतात. अशात त्यांनी सर्वसामान्यांना फसवण्यासाठी कॉल मर्जिंग स्कॅम या नव्या पद्धतीचा वापर सुरू केला असून, त्याद्वारे ते पीडितांना लक्ष्य करत आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगार ओटीपी मिळविण्यासाठी कॉल मर्ज करतात आणि ग्राहकाचे खाते रिकामे होते. दरम्यान यूपीआयने नागरिकांना याबद्दल सावध करत, एक्सवर पोस्ट करत सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.
कसा होतो कॉल मर्जिंग स्कॅम?
UPI ने X वर या नवीन प्रकारच्या फसवणुकीबद्दल माहिती दिली आहे. कॉल मर्जिंगद्वारे सायबर चोरटे कसे फसवणूक करतात आणि ते कसे टाळायचे याबाबत यूपीआयने माहिती दिली आहे. या पद्धतीने फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे ज्या व्यक्तीला लक्ष्य करू इच्छितात त्यांना फोन करतात, त्यांना एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास किंवा नोकरीसाठी विचारपूस करतात. यावेळी ते पीडिताला सांगतात की, त्यांना त्यांचा फोन नंबर मित्राकडून मिळाला आहे. दरम्यान पहिला फोन सुरू असतानाच पीडिताला दुसरा फोन येतो, तेव्हा पहिल्या फोनवरील व्यक्ती म्हणते की, तुमचा मित्र तुम्हाला दुसऱ्या नंबरवरून कॉल करत आहे. हे ऐकून पीडित जसा दुसरा फोन उचलून मर्ज करतो त्याच क्षणाला त्याच्या बँक खात्यातून पैसे साफ होतात.
दरम्यान, सायबर गुन्हेगाराचा पहिला फोन सुरू असताना दुसरा आलेला फोन ओटीपी साठी असतो. जेव्हा दुसरा कॉल येतो तेव्हा त्या व्यक्तीला ओटीपी ऐकू येतो आणि त्यामुळे खाते रिकामे होते. दरम्यान ‘ओटीपी व्हाया कॉल’ या पर्यायामुळे सायबर चोरट्यांना लोकांची फसवणूक करण्याची एकखी एक पद्धत सापडली आहे.
कॉल मर्जिंग स्कॅम कसे सुरक्षित राहायचे
दरम्यान सायबर फसवणुकीच्या या नव्या पद्धीतीपासून वाचरण्यासाठी यूपीआयने काही सूचना जारी केल्या आहेत.
- कधीही अज्ञात नंबरसह कॉल मर्ज करू नका. जेव्हा कॉल मर्ज करण्यास सांगितले जाते तेव्हा नेहमी सावधगिरी बाळगा, विशेषतः जेव्हा समोर बोलणारा व्यक्ती अनोळखी असतो.
- जर कोणी तुमचे खाते असलेल्या बँकेतून किंवा ओळखीच्या लोकांच्या संपर्कातून बोलत असल्याचा दावा करत असेल, तर कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी त्यांची ओळख पटवा.
- जर तुम्ही करत नसलेल्या व्यवहारासाठी ओटीपी आला तर, तुमच्या बँकेला याची तक्रार देण्यासाठी त्वरित 1930 वर कॉल करा.