Chandrayaan 3 Mission : चांद्रयान ३ मोहीम ही १०० टक्के यशस्वी झाली आहे. विक्रम लँडर (Vikram Lander) हे चंद्रावर अलगद पणे (soft landing) उतरले, त्यामधून प्रज्ञान रोव्हर (pragyan rover) हा चांद्र भूमिवर बाहेर पडला आणि त्याने मुक्त संचार केला. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने त्यानंतर विविध प्रयोग करत चंद्राच्या जमिनीवरील विविध माहिती आणि छायाचित्रे ही पाठवली आहेत.
थोडक्यात जे जे अपेक्षित होते ते चांद्रयान ३ च्या मोहीमेतून साध्य झाले आहे. मिळालेल्या माहितीचा अभ्यास आणि विश्लेषण करण्याचे काम सुरु आहे. आता प्रज्ञान रोव्हरने तर २२ सप्टेंबर पर्यंत चंद्रावर सूर्यादय होईपर्यंत ब्रेक घेतला आहे. असं असतांना विविध प्रयोग करण्याचा सपाटा हा इस्रोकडून (ISRO) सुरुच आहे. नुकताच एक प्रयोग केल्याचं आणि तो यशस्वी झाल्याचं इस्रोने जाहीर केलं आहे.
इस्रोचा नवा प्रयोग कोणता?
विक्रम लँडर हे आता चांद्र भूमिवर स्थिर झाले आहे आणि त्यावरील उपकरणांनी गोळा केलेली – नोंदवलेली माहिती तसंच प्रज्ञान रोव्हरकडून आलेली माहिती ही बंगळूरु इथल्या नियंत्रण कक्षाकडे पाठवण्याचं काम करत आहे. असं असतांना एक प्रयोग लँडरच्या माध्यमातून करण्यात आला. ज्या इंजिनच्या सहाय्याने विक्रम लँडर हे चांद्र भूमिवर अलगद उतरले होते ते इंजिन आज अवघे काही सेकंद का होईना सुरु करण्यात आले. यामुळे विक्रम लँडर हे चंद्राच्या भूमिपासून ४० सेंटीमीटर एवढे वरती उचलले गेले आणि त्यानंतर ही इंजिन पुन्हा नियंत्रित पद्धतीने बंद करण्यात आली. तेव्हा मूळ जागेपासून लँडर हे ३० ते ४० सेंटीमीटर बाजूला अलगद उतरले. थोडक्यात चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरने चंद्राच्या जमिनीवर पुन्हा एकदा soft landing केले.
या प्रयोगाचा फायदा काय?
इस्रोने ट्वीट करत चंद्रावरील भविष्यातील मोहिम कशी असेल याचे संकेत दिले आहेत. पुढील मोहिमेत चंद्रावरील माती-दगड हे पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न इस्रो करणार आहे. तेव्हा चंद्राच्या जमिनीवरुन यानाला पुन्हा उड्डाण करावे लागणार आहे. तेव्हा त्याची एक प्रकारे लिटमस टेस्ट आजच्या विक्रम लँडरच्या soft landing च्या माध्यमातून करण्यात आली. तसंच भविष्यात भारतीय अंतराळवीर हा चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याचे संकेतही इस्रोने दिले आहेत. कारण चंद्रावर उतरलेल्या चांद्रवीरांना परत पृथ्वीवर परतण्यासाठी यानाला चंद्राच्या जमिनीवरुन उड्डाण करावे लागणार आहे. त्याची एक प्रकारे चाचपणी इस्रोने केली आहे.
अर्थात अशा भविष्यातील मोहिम नक्की कधी असतील, त्याचा कालावधी काय असेल असे कोणतेही तपशील इस्रोने जाहिर केले नाहीत.
पुन्हा चंद्राच्या जमिनीवर अलगद उतरण्याचा प्रयोग केल्यानंतर विक्रम लँडरवरील सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे.