तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा आता एक अविभाज्य भाग बनला आहे. दिवसाची सुरुवात फोनच्या गजराने होते आणि शेवटसुद्धा त्यावर काहीतरी बघण्यातच होतो. फोन, लॅपटॉप यांवर काम करताना किंवा काम न करताना, गाणी ऐकताना, सिनेमे पाहताना, आलेला फोन उचलण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी आपण हेडफोन्स, इयरफोन्सचा वापर करीत असतो. सुरुवातीला प्रत्येकाच्या कानामध्ये वायर असणारे इयरफोन्स असायचे; मात्र ती वायर नेमकी कुठे ना कुठे अडकायची, तुटायची किंवा खराब व्हायची. मात्र, त्यांची जागा आता वायरलेस इअरफोन्स, इयरबड्सने घेतलेली दिसते आहे.
अनेक कंपन्यांनी उत्तमोत्तम वायरलेस इअरफोन्स, इयरबड्स बाजारात आणले असून, त्यामध्ये विविध प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, सुप्रसिद्ध फॅशन कंपनी ‘लुईस व्हिटोन’नेसुद्धा त्यांचे वायरलेस इयरफोन्स बाजारात आणल्याचे @aman_yadav0408 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओवरून समजते. या लक्झरी फॅशन कंपनी ‘लुईस व्हिटोन’ने हॉरिझॉन लाईट अप नावाचे इयरफोन्स [Louis Vuitton Horizon Light Up Earphones] लॉंच केले आहेत.
हेही वाचा : अरेच्चा! बूट आहेत की पाय? Louis Vuitton च्या ‘इल्युजन हाय बूट्स’ची किंमत बघून व्हाल थक्क!
लुईस व्हिटोनच्या हॉरिझॉन लाईट अप इयरफोन्सची खासियत
हे इयरफोन्स मार्च २०२३ मध्ये लाँच झाले होते. परंतु, हे इयरफोन्स त्याच्या फीचर्समुळे प्रसिद्ध झाले नसून, त्यांच्या किमतीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्याची किंमत १६६० डॉलर्स म्हणजेच एक लाख ३८ हजार २२४ रुपये इतकी आहे. हे इयरफोन्स हलक्या वजनाच्या अल्युमिनियम आणि पॉलिश्ड सफायर काचेपासून बनवले गेले आहेत. इयरफोनची केस पॉलिश्ड स्टेनलेस स्टीलची असून, त्यावर कंपनीची अक्षरे लिहिलेली आहेत. त्यासोबतच या केसला बॅकलाईटसुद्धा आहे. तसेच एका कापडी बटव्यामध्ये यूएसबी, केबल वायर्स, अडॅप्टर येतात आणि त्यावरसुद्धा कंपनीची अक्षरे लिहिलेली आहेत. हे इयरफोन्स तुम्हाला लाल, सोनेरी, काळे, चंदेरी व निळा व्हायोलेट [जांभळा] शेड असणारे अशा पाच रंगांत उपलब्ध असतील.
मार्चमध्ये लॉंच झालेल्या या लक्झरी फॅशन ब्रॅण्डच्या इयरफोन्सबद्दल जेव्हा इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @aman_yadav0408 ने एक रिव्ह्यू व्हिडीओ शेअर केला, तेव्हा या उत्पादनाची किंमत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर अनेक प्रतिक्रियासुद्धा आपल्याला पाहायला मिळतील.
“कानात सोन्याचे कानातले घातल्यासारखे दिसत आहेत,” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “लवकरच याची फर्स्ट कॉपी येईल… तोपर्यंत वाट बघतो,” असे म्हटले आहे. “फक्त १० रुपये कमी आहेत माझ्याकडे, नाही तर लगेच घेतले असते,” असा विनोद तिसऱ्याने केला आहे.
@aman_yadav0408 ने शेअर केलेल्या लुईस व्हिटोन या लक्झरी फॅशन ब्रॅण्डच्या इयरफोनच्या रिव्ह्यू व्हिडीओला तब्बल २.९ लाख व्ह्युज मिळाले आहेत.