WhatsApp Automatically Translate Messages Within Chats: भारतात विविध भाषा बोलणारी माणसं आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या भाषेला पहिलं प्राधान्य देतो आणि त्याच भाषेत मेसेज, कॉलवर संवाद साधतो. पण, कधी कधी असं होत की, समोरच्यानं संवादातून साधलेला एखादा शब्द आपल्याला समजत नाही. मग या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आपल्यातील अनेक जण सर्च इंजिन गूगलची मदत घेतात. आता ही बाब लक्षात घेऊन, व्हॉट्सॲप (WhatsApp) स्वतःचे इन-हाउस सोल्युशन घेऊन येत आहे. म्हणजेच व्हॉट्सॲप ऑटोमॅटिक चॅट ट्रान्स्लेशन (automatic chat translation) फीचर घेऊन येत आहे.
WaBetaInfo ने अहवाल दिलेल्या ॲपच्या ॲण्ड्रॉइड बीटा प्रोग्राम (आवृत्ती 2.24.15.9)च्या अलीकडील अपडेटनुसार, व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करीत आहे; जे वापरकर्त्यांना चॅटमधील संदेश स्वयंचलितपणे (ऑटोमॅटिक) ट्रान्स्लेट करण्यास मदत करील. हे फीचर बाह्य ॲप्सची आवश्यकता दूर करील; ज्यामुळे भाषेतील अडथळे ओलांडून संवाद अगदीच सोईस्कर होईल. तर नक्की कोणत्या व किती भाषांमध्ये हे फीचर उपलब्ध असेल जाणून घेऊ.
यापूर्वी असाच एक अहवाल समोर आला होता की, व्हॉट्सॲप (WhatsApp) गूगलच्या लाइव्ह भाषांतर तंत्रज्ञानाचा (Google’s live translation) उपयोग करू शकते. पण, नवीन फीचर वा अपडेट असे सूचित करते की, कंपनी एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी आणि वापरकर्त्याच्या गोपनीयतेला प्राधान्य देण्यासाठी स्वतःचे इन-हाउस सोल्युशन विकसित करीत आहे. हे वैयक्तिक मोडवर तुम्ही केलेल्या संदेशाचे भाषांतर ठेवेल. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन राखेल आणि बाह्य सर्व्हरवर संदेश पाठविण्याची गरज दूर करील.
हे फीचर बीटा अपडेट वापरकर्त्यांसाठी सर्व चॅटसाठी स्वयंचलित भाषांतर (ऑटोमॅटिक ट्रान्स्लेशन) करण्याचा पर्याय देत आहे. तसेच सुरुवातीला इंग्रजी, अरबी, स्पॅनिश, पोर्तुगीज (ब्राझील), रशियन व हिंदी यांसह मर्यादित भाषांसाठी हे फीचर उपलब्ध असेल. भविष्यात या फीचरमध्ये आणखी भाषा जोडल्या जातील. या फीचरची घोषणा अधिकृतपणे जाहीर झाली नसली तरीही संवादात येणारे अडथळे दूर करण्याच्या दिशेनं व्हॉट्सॲपनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे, असं म्हणायला हरकत नाही.