व्हॉट्सअॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी Meta आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स सादर करत असते. आता कंपनीने एक मोठी कारवाई केली आहे. मेटाच्या मालकीचे असणाऱ्या व्हॉट्सअॅपने नवीन IT २०२१ च्या नियमांचे पालन करून भारतातील तब्बल ७४ लाखांपेक्षा जास्त चुकीच्या अकाउंट्सवर बंदी घातली आहे. अहवालानुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या व्हॉट्सअॅपने १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान देशभरातील किमान ७४,२०,७४८ अकाउंट्सवर बंदी घातली आहे. यापैकी सुमरे ३५,०६,९०५ अकाउंट्स वापरकर्त्यांनी रिपोर्ट करण्याआधीच बंद करण्यात आली आहेत.
सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ऑगस्ट महिन्यात भारतामध्ये १४,७६७ अशा विक्रमी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ७१ अकाउंट्सवर कंपनीने कारवाई केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वापरकर्ता सुरक्षा रिपोर्टमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे करण्यात आलेल्या कारवाईसह WhatsApp च्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक कृतींचे तपशील आहेत. याबाबतचे वृत्त news18 ने दिले आहे.
व्हॉट्सअॅपला ऑगस्ट महिन्यात देशातील तक्रार अपील समिती (GAC) कडून एक आदेश प्राप्त झाला होता. त्या आदेशाचे पालन कंपनीने केले. केंद्र सरकारने अलीकडेच कंटेंट आणि संबंधित गोष्टीबाबत वापरकर्त्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तक्रार अपील समिती (GAC) स्थापन केली आहे. या समितीचे लक्ष्य डिजिटल नियमांचे मजबुतीकरण आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या निर्णयांविरुद्ध वापरकर्त्यांनी केलेल्या अपीलावर काम करणे हे आहे.
दरम्यान, WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप फोटोज, व्हिडीओज आणि GIF वर त्वरित रिप्लाय देण्यासाठी एक नवीन रिप्लाय बार हे फिचर आणत आहे. वापरकर्त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड 2.23.20.20 अपडेटसाठी नवीन WhatsApp बीटा इन्स्टॉल करावे. हे WhatsApp बीटा इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्यांना फोटो किंवा व्हिडीओ पाहताना नवीन रिप्लाय बार फिचर उपलब्ध होणार आहे.