WhatsApp introduces Context Card: व्हॉट्सॲप वैयक्तिक मेसेज ते अगदी ऑफिसच्या कामापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी उपयोगी आहे. मेटा कंपनीसुद्धा युजर्सचा अनुभव आणखीन खास करण्यासाठी नवनवीन फीचर्स युजर्ससाठी घेऊन येत असते. अनेकदा असं होतं की, अचानक आपल्याला एक नोटिफिकेशन येतं आणि आपण एका अनोखळी ग्रुपमध्ये आपोआपच ॲड होऊन जातो. मग कोणी ॲड केलं? का ॲड केलं? कशासाठी केलं? असे प्रश्न मनात फेर धरून नाचू लागतात. तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण व्हॉट्सॲप आता कॉन्टेक्स्ट कार्ड (Context Card) फीचर घेऊन आला आहे. तर या फीचरचा उपयोग कसा होणार, चला तर या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
ग्रुप मेसेजिंगमध्ये सुरक्षित राहण्यास मदत करेल (new feature that will help users stay safe in group messaging) :
व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणत आहे, जे वापरकर्त्यांना ग्रुप मेसेजिंगमध्ये सुरक्षित राहण्यास मदत करेल. तुम्हाला एखाद्या अनोळखी माणसं असणाऱ्या ग्रुपमध्ये ॲड केल्यास तुम्हाला त्या ग्रुपमध्ये एक कार्ड दिसेल, ज्याचं नाव कॉन्टेक्स्ट कार्ड (Context Card) असेल. या कार्डमध्ये तुम्हाला ग्रुपबद्दल अधिक माहिती देणारे संदर्भ असतील. म्हणजेच या कार्डमध्ये तुम्हाला ग्रुपमध्ये कोणी ॲड केले, ग्रुप कधी तयार झाला, कोणी तयार केला, का तयार केला आदींचा समावेश असेल. तर हे कार्ड आणि त्यावरील माहिती पाहून या ग्रुपमध्ये राहायचे आहे की ग्रुप लेफ्ट करायचा, हे तुम्ही ठरवू शकता.
तुम्ही आत्ताच एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा ग्रुपला भेटले असाल, तुमच्या फोनमध्ये त्यांचा नंबर सेव्ह नसेल आणि त्यांनी तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये ॲड केलं असेल, तर हे फीचर तुमच्या कामी येईल. तसेच तुम्हाला विनाकारण कोणी ग्रुपमध्ये ॲड केलं असेल तर हे तुम्हाला त्या ग्रुप व अनोळखी व्यक्तींसंबंधितची सर्व माहिती अचूक सांगण्यात मदत करेल एवढं नक्की. या व्यतिरिक्त अज्ञात कॉलर्सना सायलेंट करणे, चॅट लॉक, इन ॲप प्रायव्हसी, चेकअप आणि तुम्हाला ग्रुपमध्ये कोण ॲड करू शकतं, हे कंट्रोल करणारे फीचर्ससुद्धा आहेत. कॉन्टेक्स्ट कार्ड (Context Card) हे फीचर आधीच वापरकर्त्यांसाठी रोलआउट केलं आहे आणि येत्या आठवड्यात सर्व वापरकर्त्यांसाठी हे उपलब्धसुद्धा होईल