व्हॉटसअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मपेक्षा व्हॉटसअॅपवरून संपर्क साधणे अगदी सोपे होते, तसेच कॉल, व्हिडीओ कॉल, फोटो – व्हिडीओ शेअर करणे अशा अनेक अधिकच्या सुविधा या मेसेजिंग अॅपवर उपलब्ध आहेत. त्यामुळेच संवाद साधण्यासाठी व्हॉटसअॅपला अनेकजण प्राधान्य देतात. व्हॉटसअॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. असेच एक ग्रुप चॅटशी निगडित एक नवे फीचर लवकरच रोल आऊट होणार आहे, काय आहे हे फीचर जाणून घ्या.
ग्रुप चॅटसाठी व्हॉटसअॅप सर्वात जास्त वापरले जाते. त्यातच काही दिवसांपुर्वी व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये १ हजारपेक्षा जास्त व्यक्तींना अॅड करता येणार असल्याची घोषणा करण्यात आली, हे फीचर कधी लाँच होणार याची युजर्स वाट पाहत असतानाच ग्रुप चॅटशी निगडित आणखी एका नव्या फीचरची माहिती समोर आली आहे. ‘व्हॉटसअॅप बीटा इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉटसअॅपवर लवकरच नवे फीचर लाँच होणार आहे ज्याद्वारे ग्रुप चॅटवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा डीपी म्हणजेच प्रोफाइल फोटो दिसणार आहे.
डेस्कटॉपवर देखील उपलब्ध होणार हे फीचर
‘व्हॉटसअॅप बीटा इन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार या फीचरवर काम सुरू असून, लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होईल. हे फीचर डेस्कटॉपवरही उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.
कसे असेल हे फीचर
ग्रुप चॅटवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीच्या नावापुढे एक आयकॉन दिसेल ज्यात प्रोफाइल फोटो म्हणजेच डीपी दिसेल. याच्या मदतीने ग्रुपमधील सदस्यांना मेसेज कोणी पाठवला हे पटकन ओळखता येईल. तसेच जर एखाद्या व्यक्तीने प्रोफाइल फोटो हाईड केला असेल किंवा प्रोफाईल फोटोच नसेल तर फोटोच्या जागी मेसेजच्या रंगाचा आयकॉन दिसेल.