स्नॅपचॅट (Snapchat) हे तरुण मंडळींचे आवडते ॲप आहे. कंपनी लेन्सच्या स्वरूपात विविध स्नॅपचॅट फिल्टर्स (Snapchat Filters) ऑफर करत असते. हे युजर्सना ओपन-सोर्स सॉफ्टवेअर वापरून रिअल टाइममध्ये त्यांचा लूक सुधारण्याची परवानगी देते. म्हणजेच हे फिल्टर वापरून तुम्ही छान छान फोटो काढू शकता आणि फोटो सेव्ह केल्यानंतर ते इतर प्लॅटफॉर्मवरसुद्धा सहज शेअर करू शकता. तर आता स्नॅपचॅटनंतर व्हॉट्सॲपसुद्धा तुमच्यासाठी फिल्टर्स घेऊन येत आहे.
व्हॉट्सॲपने व्हिडीओ कॉलसाठी ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) (augmented reality) इफेक्टस आणण्याची योजना आखत आहे. म्हणजेच व्हॉट्सॲप एका फीचरवर काम करीत आहे; जिथे तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलदरम्यान (WhatsApp Video Call) व्हीआर इफेक्टस आणि फिल्टर जोडू शकणार आहात. स्नॅपचॅट व ॲपलने ‘लेन्स’ आणि ‘फेस-टाइम’मध्ये एआर इफेक्ट आणल्यानंतर आता व्हॉट्सॲपसुद्धा त्यात सहभागी होणार आहे. नवीन फीचर भविष्यात ॲण्ड्रॉइड युजर्ससाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
हे नवीन AR इफेक्ट्स तुम्हाला तुमच्या व्हिडीओ कॉल्समध्ये मजेशीर गोष्टी जोडण्याची परवानगी देईल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कॉलमध्ये चेहऱ्याचे फिल्टर्स, त्वचेला गुळगुळीत करण्यासाठी टच-अप टूल, लो लाईट मोड आदी अनेक फिल्टरचा उपयोग युजर्स करू शकणार आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ कॉल्स अधिक मनोरंजक आणि आकर्षक बनविणारे इतर इफेक्ट्सदेखील सादर करण्याची योजना आखत आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत :
WABetaInfo ने सांगितल्याप्रमाणे कॉलदरम्यान रिअल-टाइम व्हिडीओ फीडच्या जागी अवतार (Avatar) वापरण्याचाही पर्याय लवकरच मिळणार आहे. हे फीचर तुमचा चेहरा किंवा तुमचे नाव गुप्त ठेवण्याची किंवा अवतारांद्वारे इतरांशी बोलण्याची संधी देणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता, अवतार तयार केल्याने युजर्सना प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून हे फीचर फारच उपयोगी ठरेल. एकूणच हे जबरदस्त फीचर्स ॲण्ड्रॉइड युजर्स लवकरच वापरू शकणार आहेत.