मेटाच्या मालकीचे व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल, चॅट, स्टेटस आदी पर्यायांव्यतिरिक्त व्यवहार किंवा ऑफिसच्या कामांसाठीही उपयुक्त आहे. जसे की, ऑफिसमधील एखादी माहिती किंवा संदेश स्टार मार्क किंवा पिन करून ठेवावेत म्हणजे ते संदेश गरजेच्या वेळी सहज उपलब्ध होतील. कंपनी युजर्ससाठी अपडेटद्वारे वेळोवेळी विविध पर्याय सादर करीत असते. आता कंपनी युजर्ससाठी आणखी एक खास फीचर घेऊन येत आहे; ज्याच्या मदतीने तुम्ही जुने संदेश सहज शोधू शकणार आहात.
व्हॉट्सअॅपवर एखादा जुना मेसेज सर्च करायचा असेल, तर युजर्सना त्या तारखेपर्यंत स्क्रोल करीत जावे लागते किंवा चॅटमध्ये जाऊन तीन डॉटवर क्लिक करून, सर्च हा पर्याय निवडावा लागतो आणि तिथे त्या मेसेजमधील शब्द लिहावे लागतात. मग ते शब्द असलेले सर्व जुने मेसेज आपल्याला स्क्रीनवर एकामागोमाग दिसतात; ज्यामध्ये आपल्याला पाहिजे तो मेसेजही असतो. आता व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना पाहिजे तो मेसेज शोधण्यासाठी एक खास पर्याय आणला आहे; ज्याच्या मदतीने तुम्ही काही सेकंदांत इच्छित मेसेज शोधू शकणार आहात.
हेही वाचा…तुमचा फोन तुमचे बोलणे ऐकतोय का? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? मग एकदा ‘ही’ माहिती नक्की वाचा…
व्हॉट्सअॅप वेब बीटासाठीही व्हॉट्सअॅप कंपनी नवीन फीचर घेऊन येत आहे; ज्याचे नाव ‘कॅलेंडर फीचर’ (Calender Feature) असे आहे. हे अॅण्ड्रॉइड अॅपच्या बीटा आवृत्तीमध्ये उपलब्ध होईल. अॅण्ड्रॉइड पॉलिसी डॉट कॉमच्या अहवालानुसार युजर्सना चॅटमध्ये सर्च पर्यायांमध्ये काही दिवसांनी छोटेसे एक ‘कॅलेंडर चिन्ह’ दिसेल. त्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक कॅलेंडर ओपन झालेले दिसून येईल.
व्हॉट्सअॅप वापरकर्ते आणि विशिष्ट ग्रुपमध्येदेखील हे कॅलेंडर आयकॉन तुम्हाला दिसून येईल; ज्याच्या मदतीने तुम्ही खूप महिने आधीच्या चॅट्स किंवा काही महत्त्वाचे मेसेज सहज शोधू शकणार आहात. तसेच तुम्हाला एखादा मेसेज शोधण्यास डाव्या-उजव्या बाजूला स्वाइप करावे लागेल आणि तो मेसेज शोधावा लागेल. एखादा मेसेज तारखेनुसार सर्च करणे वापरकर्त्यांसाठी सोईस्कर जाईल, असे कंपनीला वाटते. म्हणून हे फीचर लवकरच लाँच करण्यात येईल.
सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे; पण लवकरच ते अॅण्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप कंपनी ‘कॅलेंडर फीचर’वर काम करीत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. जून २०२० पासून व्हॉट्सअॅप कंपनी आयफोनसाठीसुद्धा हे फीचर घेऊन येण्याचा विचार करीत होती; जे कंपनी आता येत्या नववर्षात किंवा या महिन्याच्या अखेरीस अॅण्ड्रॉइड युजर्ससाठी घेऊन येणार आहे.