WhatsApp Down : व्हॉट्सअॅपची सेवा डाऊन झाली असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅपच्या सेवांमध्ये व्यत्यय येत असून हजारो व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यास, स्टेटस अपलोड करण्यास आणि व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन आणि वेब व्हॉट्सअॅप हे देखील कनेक्ट होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हजारो व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असून याविषयीच्या तक्रारी अनेकांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.
दरम्यान, भारतासह जगभरातील अनेक व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना या अडचणी येत आहेत. ऑनलाइन सेवांच्या स्थितीवर लक्ष ठेवणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरने वापरकर्त्यांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. भारतात ९०० हून अधिक तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमध्ये संदेश पाठविण्याच्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, तर उर्वरित सर्व्हर कनेक्शन समस्या असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
तसेच जागतिक स्तरावर अंदाजे १,००० व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अशा प्रकारच्या समस्या येत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या असून त्यापैकी ९१ टक्के व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी संदेश पाठवण्यात समस्या येत असल्याचं सांगितलं आहे. तसेच ६ टक्के वापरकर्त्यांनी अॅप समस्या नोंदवल्या आहेत. तसेच ३ टक्के वापरकर्त्यांनी मेसेज प्राप्त करण्यात समस्या येत असल्यासं सांगितलं आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने अद्याप याबाबत कोणतंही निवेदन जारी केलेलं नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अशा प्रकारच्या अडचणी का येत आहेत? याचं कारण मेटाने स्पष्टीकरण दिल्यानंतरच समोर येणार आहे.
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
व्हॉट्सअॅपची सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना मेसेज पाठवण्यास, स्टेटस अपलोड करण्यास अडचणी आल्यानंतर अनेकांनी ट्विटरसह वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर मीम्सचा भडिमार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.व्हॉट्सअॅप बंद आहे का? स्टेटस अपलोड करण्यास अडचणी येत आहेत, अशा पोस्ट अनेकांनी केल्या आहेत.