WhatsApp Warning For Indian Users: केंद्र सरकारने या आठवड्यात व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या भारतीय कंम्प्युटर इमर्जन्सी रिन्स्पॉन्स टीमने (CERT-IN) डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी ही सूचना जाहीर केली आहे. ज्यांनी आपल्या डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप इन्स्टॉल केले आहे. त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

व्हॉट्सॲपच्या काही कमतरतेचा फायदा घेऊन हॅकर्स वैयक्तिक डेटा चोरू शकतात, असे सरकारने सांगितले आहे. यामुळे युजर्सचे बँक खाते मोकळे होऊ शकते. त्यामुळेच सरकारने त्वरीत व्हॉट्सॲप अपडेट करण्याची सूचना दिली आहे. व्हॉट्सॲपने आपल्या नव्या अपडेटमध्ये सुधारणा केल्या असून हॅसर्सपासून ते सुरक्षित केलेले आहे. याशिवाय युजर्सने कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. जर एखाद्या अनोळखी क्रमाकांवरून मेसेज पाठविला गेला तर त्याला रिप्लाय करू नये किंवा तो नंबर ब्लॉक करावा, असेही सांगण्यात आले आहे.

डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?

१. युजर्सनी डेस्कटॉपवरील व्हॉट्सॲप त्वरीत अपडेट करावे. नवीन आवृत्ती २.२४५०.६ किंवा त्यावरील आवृत्ती अपडेट करून घ्यावी.

२. व्हॉट्सॲपच्या डेस्कटॉप व्हर्जनवर एखाद्या मेसेजमधून आलेली कोणतीही संशयास्पद फाईल ओपन करू नये.

३. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवल्यास अधिकचे संरक्षण मिळू शकते.

४. व्हॉट्सॲपचे डेस्कटॉप व्हर्जन अधिकृत संकेतस्थळ किंवा मायक्रोसॉफ्ट स्टोअर सारख्या अधिकृत स्त्रोतांकडूनच डाऊनलोड करावे.

भारतात ४० कोटीहून अधिक व्हॉट्सॲप वापरकर्ते आहेत. त्यामुळे सायबर चोरट्यांसाठी सोपे लक्ष्य झाले आहे.