अॅपल आणि गुगल या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दादा कंपन्या. सध्याच्या घडीला या दोन कंपन्यांचं अस्तित्व इतकं मोठं आहे की जगातील बहुतांश फोन हे या दोन कंपन्यांनी निर्माण केलेल्या ऑप्रेटिंग सिस्टीमवरच काम करतात. अॅपलची आयओएस म्हणजेच अॅपल ऑप्रेटींग सिस्टीम आणि गुगलची अॅण्ड्रॉइड. त्यामुळेच या दोन्ही कंपन्या या ना त्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी सोशल मीडियापासून ते विरोधक कंपनीचा नवीन फोन बाजारात येण्यापर्यंत अनेक विषयांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दोन्ही कंपन्यांकडून आपणच कसे वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु असतो. मात्र असाच प्रयत्न भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या गुगलला महागात पडला. अॅपलला ट्रोल करण्याच्या नादात गुगलच ट्रोल झालं असून विशेष म्हणजे ज्या मुद्द्यावरुन ट्रोल केलं जात होतं तो मुद्दा गुगलच्या ट्रोलिंगसाठी कारणीभूत ठरतोय.
झालं असं की गुगलने अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांच्या एका ट्वीटवर कमेंट केली. मात्र गुगल पिक्सलच्या अमेरिकी व्हेरिफाइड अकाऊंटवरुन कूक यांना ट्रोल करण्यासाठी केलेलं ट्वीट हे चक्क आयफोनवरुन करण्यात आलेलं. गुगल पिक्सला हा गुगलचा स्वत:चा फोन असून त्याच अकाऊंटचं ट्वीट आयफोनवरुन करण्यात आल्याचा विरोधाभास नेटकऱ्यांनाही गोंधळात टाकणारा ठरला.
गुगल पिक्सल युएसच्या अकाऊंटवरुन, “हमम, ओके तर असं आहे काय. एनबीएच्या चाहत्यांनी याची दखल घ्यावी की टीम पिक्सल तुम्हाला तुमच्या आवडत्या संघाच्या अधिक जवळ घेऊन जाणार आहे. आम्हाला तुमचा आवडता एमबीए संघ कोणता आहे कळवा आणि आम्ही तुमची ही ट्रीप अधिक रंजक बनवू,” असा रिप्लाय कूक यांच्या ट्वीटवर करण्यात आला होता. या ट्वीटच्या खाली ‘ट्वीटर वेब अॅप’ असं दिसतं असलं तरी हे मूळ ट्वीट नाहीय.
हे वर दिसणारं ट्वीट खरं ट्वीट नसून ते गुगलकडून रिप्लेस करण्यात आलेलं ट्वीट आहे. कारण हे खरं ट्वीट आयफोनवरुन करण्यात आलं होत. ट्वीट करणाऱ्याला आपली चूक लक्षात आल्यानंतर लगेच हा रिप्लेसमेंटचा बदल करण्यात आला. मात्र हे करेपर्यंत एकाने स्क्रीनशॉट काढून तो या ट्वीटवर पोस्टही केला. या मूळ ट्वीटमध्ये ‘ट्वीटर फॉर आयफोन’ अशी अक्षर दिसत आहेत. तुम्हीच पाहा हा फोटो.
मुळात आपल्या विरोधक कंपनीला ट्रोल करण्याच्या दृष्टीने त्याच कंपनीचा फोन वापरुन अधिकृत अकाऊंटवरुन अशाप्रकारे ट्वीट करणं हे चुकीचं आहे. मात्र त्याहून भयानक गोष्ट म्हणजे अॅपलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या ट्वीटवर त्याच्याच कंपनीला ट्रोल करणारं हा आहे. ट्वीट करण्यासाठी ज्या कंपनीला ट्रोल करतोय त्याच कंपनीचा फोन वापरणं आणि हा गोंधळ पकडलं जाणं ही फारच लाजेची गोष्ट आहे. टिम कूक यांच्या ट्वीटवर रिप्लाय करुन पिक्सलचं प्रमोशन करण्याचा विचार होता. मात्र पिक्सलचा डाव त्यांच्यावरच उलटला.