Xiaomi ने एक खास स्मार्ट छत्री (Smart Umbrella) क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म Xiaomi Youpin वर आणली आहे. काही कालावधीनंतर हे उत्पादन क्राऊडफंडिंग जमा करेल आणि त्यानंतर ही छत्री लाँच करण्यात येईल. क्राऊडफंडिंग सुरु असल्याने या छत्रीची किंमत सवलतीत ठेवण्यात आली आहे. मात्र एकदा ही स्मार्ट छत्री लाँच झाली की तिची किंमत वाढणार आहे.
काय आहेत स्मार्ट छत्रीची वैशिष्ट्ये?
ही एक स्मार्ट छत्री आहे, ती चार्ज केल्यानंतर १८० दिवस चालते असा दावा करण्यात आला आहे.
ही वन टच अंब्रेला आहे, या खास फिचरमुळे ही छत्री दोन सेकंदात उघडली जाते. तसंच बंद होण्यासाठीही दोन सेकंद लागतात.
ही छत्री खास अॅल्युमिनियम एलॉय फ्रेमने तयार करण्यात आली आहे, सोसाट्याचा वारा वाहिला तरीही ही छत्री आहे तशीच राहते, ती उलट होत नाही.
रात्री पाऊस पडत असेल तर या छत्रीच्या कोपऱ्यांवर लाईट लावण्यात आले आहेत ज्यांचा वापर करता येऊ शकतो.
या स्मार्ट छत्रीची किंमत काय?
अशी खास स्मार्ट फिचर असलेली ही छत्री Xiaomi ने आणली आहे. Xiaomi ने Risetime सह एकत्र येत ही स्मार्ट छत्री Youpin या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मवर लिस्ट केली आहे. या छत्रीची किंमत १२९ युआन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास १५०० रुपये आहे. लाँचनंतर या छत्रीची किंमत नक्कीच वाढेल. ही किंमत तेव्हा किती असेल? हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेलं नाही.
स्मार्ट छत्रीमध्ये आहे खास मोटर
Xiaomi च्या या छत्रीमध्ये एक खास इलेक्ट्रिकल मोटर लावण्यात आली आहे. त्यामुळे ही छत्री एका टचने उघडते आणि एका टचने बंद होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही छत्री अत्यंत उपयोगी आहे कारण कारण ही छत्री उघडण्यासाठी दोन्ही हातांची गरज नाही. तसंच छत्री उघडण्याचा वेळ अवघा दोन सेकंदांचा आहे. त्यामुळे पाऊस पडत असेल तर ही छत्री तातडीने उघडता येते. ही छत्री एका खास मोटरवर चालते, ही मोटर हँडलबारमध्ये बसवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की छत्री चार्ज केल्यानंतर ती १५० वेळा उघडली जाते आणि बंद करता येते. या छत्रीतली बॅटरी 280mAh ची आहे. छत्री पूर्ण चार्ज करण्यासाठी दीड तास लागतो. या छत्रीचा स्टँडबाय टाइम १८० दिवस आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही छत्री १८० दिवस चालते असाही कंपनीचा दावा आहे. Gadgets360.com ने हे वृत्त दिलं आहे.