Old iPhone Exchange offer: iPhone 16 लाँच झाल्यापासून डिजिटल उपकरणांच्या जगात फक्त त्याचीच चर्चा आहे. २० सप्टेंबर रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील आयफोन स्टोअरमध्ये नव्या मॉडेलची विक्री सुरू झाली आणि आयफोनच्या चाहत्यांनी अगदी सकाळपासून रांगा लावून आपला आवडता फोन मिळविण्याची धडपड केली. दरवर्षी आयफोनची निर्माती कंपनी ॲपल ही काही ना काही उत्पादने बाजारात आणण्याचा प्रयत्न करत असते. मागच्या काही वर्षात आयफोन १२ पासून ते आता १६ पर्यंतचे मॉडेल एका वर्षाच्या फरकाने लाँच करण्यात आले आहेत. अशावेळी ज्यांनी आधीच आयफोन घेतला आहे, तेदेखील आपला जुना फोन देऊन नवीन फोन घेऊ शकतात. यासाठी ॲपल स्टोअरने एक्सचेंज ऑफर आणली आहे. ती ऑफर काय आहे? या माध्यमातून किती पैसे वाचू शकतात? हे जाणून घेऊ.
कोणत्या जुन्या मॉडेलचा स्वीकार होणार?
iPhone 16 घेण्यासाठी तुमच्याकडे जुने आयफोन १२, १३, १४ आणि १५ असतील तरच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. १२ च्या आधीच्या मॉडेलसाठी ही योजना मिळणार नाही.
आयफोन ट्रेड इन ऑफर काय आहे?
ॲपलच्या ट्रेड इन ऑफर अंतर्गत तुम्हाला जुने आयफोन देऊन ॲपल स्टोरकडून नवीन आयफोन विकत घेताना डिस्काऊंट मिळतो. ही सुविधा ॲपल ऑनलाईन साईटवरही उपलब्ध आहे. एका अर्थी आपला जुना आयफोन पुन्हा कंपनीला देऊन त्याबदल्यात नव्या फोनची रक्कम काही प्रमाणात कमी करून घेता येते.
iPhone 15 वर ३७,९०० रुपयांची ट्रेड इन ऑफर मिळत आहे. हा फोन सध्या बाजारात ६९,९०० ला मिळत आहे. तर iPhone 14 वर ३२,१०० चा डिस्काऊंट मिळत आहे. हा फोन सध्या बाजारात ५९,९०० ला मिळत आहे. तर iPhone 13 वर ३१,१०० रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. तर iPhone 12 वर २०,८०० रुपये एवढा डिस्काऊंट मिळेल. १२ आणि १३ ही दोन्ही मॉडेल्स उत्पादित करणे आयफोनने बंद केले आहे.
नियम काय आहेत?
जर नवीन आयफोन विकत घ्यायचा असेल तरच ॲपल स्टोअरकडून ट्रेड इन ऑफर दिली जाते. त्याबदल्यात रोकड मिळत नाही. तसेच तुमच्या जुन्या फोनची सद्यपरिस्थितीचे विश्लेषण केल्यानंतर त्याच्या किंमतीमध्ये फरक होऊ शकतो. वर नमूद केलेली रक्कम ही कमाल रक्कम आहे. पण फोनची परिस्थिती पाहून अंतिम ऑफर स्टोअरकडूनच दिली जाईल.
आयफोन १६ कुठून खरेदी करता येईल?
ग्राहक आता ॲपल स्टोअर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटलवरून आयफोन १६, आयफोन १६ प्लस , आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स ( iPhone 16 Pro Max) ऑनलाइन खरेदी करू शकतात. तसेच दिल्ली, मुंबईतील ॲपल स्टोअर्स व देशातील इतर अधिकृत रिटेल स्टोअर्समधून ऑफलाइन देखील खरेदी करू शकतात.
आयफोन १६ ची किंमती किती?
भारतात iPhone 16 ची (१२८ जीबी) किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. त्यानंतर २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेजची किंमत यापेक्षा पुढे असेल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,३४,९९० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्स १,५९,००० रुपये असेल. चारही मॉडेलची ही मुळ किंमत असून स्टोरेजच्या पर्यायानुसार किंमत वाढेल.