आधार कार्ड बनवताना आपल्याला आपली बायोमॅट्रिक माहिती रजिस्टर करावी लागते. या आपल्या हाताची १० बोटे आणि डोळ्यांचा रेटिना स्कॅन केला जातो. हे बायोमॅट्रिक आपली संपूर्ण ओळख ठेवण्याच्या कमी येते. तसेच, हे आपल्या ओळखीच्या संदर्भातील कामांमध्ये भरपूर उपयोगी पडते. परंतु नुकतेच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात आपल्या बायोमॅट्रिक माहितीचा चुकीचा उपयोग केला जात असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. अशा परिस्थितीत आपली ही माहिती सुरक्षित ठेवणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपण एम-आधारच्या मदतीने आपल्या आधार कार्डचे बायोमॅट्रिक लॉक करू शकतो. परंतु अनेकदा गरजेच्या वेळी हे लॉक आपल्याला अनलॉक करता येत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज आपण एम-आधारच्या मदतीने आपल्या आधार कार्डचे बायोमॅट्रिक अनलॉक कसे करू शकतो हे जाणून घेऊया.
आधार लॉक कसे होते ?
1. आपले आधार आणि बायोमॅट्रीक लॉक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरमध्ये जाणून एम-आधार हे अॅप डाउनलोड करावे लागेल.
2. एम-आधार अॅप डाउनलोड झाल्यावर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक यात टाकावा लागेल. यानंतर आपल्याला एक ४अंकी पिन मिळेल. हा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. कारण जेव्हाही आपण एम-आधार हे अॅप उघडू तेव्हा हे अॅप सुरु होण्यासाठी ही पिन आपल्याला मदत करेल.
3. यानंतर आपल्याला डिस्प्लेवर एम-आधार लिहलेले दिसेल. त्याच्या खाली आपल्याला १२ क्रमांकाचा आधार नंबर टाकावा लागेल. जसे आपण आपला आधार क्रमांक येथे टाकू तसे आपल्याला आपले डिजिटल आधार कार्ड दिसेल. यानंतर तुम्हाला मोबाईल स्क्रीनच्या सर्वात खाली एम-आधार असे लिहलेले दिसेल. यावर क्लिक करताच तिथे पिन टाकण्याचा पर्याय दिसेल. पिन टाकताच तुमच्या समोर दुसरी स्क्रीन समोर येईल.
हेही वाचा : ‘हे’ अॅप वापरून दुसऱ्या ठिकाणाहूनही नियंत्रित करू शकता आपला फोन आणि लॅपटॉप
आभासी आयडी (Virtual ID) तयार करणे
आधार आणि बायोमॅट्रिक लॉक करण्याआधी आपल्याला आपली आभासी आयडी (Virtual ID) तयार करावी लागेल. समोर दिसणाऱ्या ५ पर्यायांपैकी ३ क्रमांकावर आपल्याला यासंबंधीचा पर्याय दिसेल. इथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर आपल्याला एक ओटीपी मिळेल. हा ओटीपी सबमिट केल्यानंतर आपले आभासी आयडी (Virtual ID) तयार होईल. हे आयडी तुम्ही कोणत्याही सुरक्षित ठिकाणी लिहून ठेवा.
आधार आणि बायोमॅट्रिक लॉक करणे
आभासी आयडी (Virtual ID)च्या मदतीने आपण आपले आधार कार्ड आणि बायोमॅट्रिक लॉक करू शकतो. यामुळे आधार लॉक झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती तुमच्या इच्छेविरुद्ध तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकणार नाही. तसेच, बायोमॅट्रिक लॉक केल्यानंतर तुमचा अंगठा लावल्यानंतरही कोणी तुमचे आधार स्कॅन करू शकणार नाही. याबरोबरच तुम्ही गरज भासल्यास आपले आधार आणि बायोमॅट्रिक अनलॉक करू शकतो.
एम-आधारच्या मदतीने आधार कार्ड आणि बायोमॅट्रिक करा अनलॉक
यासाठी आपल्याला ४ अंकी पिनच्या मदतीने एम-आधार उघडायचे आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या आधाराला अनलॉक करावे लागेल. यासाठी अनलॉक आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे. असे केल्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक मागितला जाईल. हा क्रमांक दिल्यानंतर मिळालेल्या ओटीपीच्या मदतीने आपले आधार अनलॉक होईल. यानंतर बायोमॅट्रिक अनलॉकवर क्लिक केल्यानंतर हीच प्रक्रिया आपल्याला पुन्हा करावी लागेल. अवघ्या १० मिनिटात आपल्या आधाराचे बायोमॅट्रिक अनलॉक होईल.