देशात अलीकडेच पंतप्रधानांच्या हस्ते 5G सेवा सादर झाली आहे. त्यानंतर सर्वत्र 5G नेटवर्कची चर्चा सुरू झाली आहे. जीओ आणि एअरटेलची 5G सेवा अनेक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आता 5G सुरू झाल्याने सायबर चोरही सक्रिय झाले आहेत. 5G सेवेच्या नावाखाली ते लोकांची फसवणूक करत आहेत. यामुळे त्यांचे बँक खाते रिकामे होऊ शकते. याबाबत पोलिसांनी इशाराही दिला आहे. 5G सिम अपग्रेड नावाच्या लिंकवर क्लिक करताच लोकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत. या संदर्भात पोलिसांनी लोकांना सावधही केले आहे.
हैदराबाद सायबर पोलिसांनी 5G संदर्भात सुरू असलेल्या घोटाळ्याबाबत सतर्क केले आहे. युजर्सनी फोनवर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये, असे या वॉर्निंगमध्ये म्हटले आहे. यामुळे त्यांचे बँक खाते रिकामे होऊ शकते. फोनमध्ये सापडलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करून लोकांच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले, यासंदर्भात त्यांच्याकडे अनेक तक्रारी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे इतर लोकांनीही या नव्या फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेऊया…
काही स्कॅमर ग्राहकांच्या फोनवर एक लिंक पाठवत आहेत. अनेकांना सध्या आपले नेटवर्क अपग्रेड करत 4G वरून 5G करायचे आहे. या लिंकमध्ये ग्राहकांच्या या मनस्थितीचा फायदा घेत ग्राहकांना 4G वरून 5G नेटवर्कवर अपग्रेड करण्यास सांगितले जाते आहे. हा अधिकृत संदेश आहे असे समजून लोक उत्साहाने या लिंकवर क्लिक करत आहेत पण प्रत्यक्षात या लिंकद्वारे सायबर गुन्हेगार केवळ फोनच हॅक करत नाहीत तर डेटाही चोरत आहेत.
आणखी वाचा : ‘हा’ रिचार्ज केल्यावरच ग्राहकांना घेता येणार JIO 5G सेवेचा लाभ; नाहीतर मिळणार नाही सेवा…
या प्रकारे होते फसवणूक
या घोटाळ्यात लोकांना लिंक पाठवली जाते. यामध्ये असे म्हटले आहे की, 4G वरून 5G वर अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला या लिंकवर क्लिक करावे लागेल. तो अधिकृत संदेश मानून, लोक त्यावर क्लिक करतात. पण, यामुळे तुमचा डेटा स्कॅमरपर्यंत पोहोचतो.
एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, लिंकवर क्लिक केल्यावर सायबर क्रिमिनलला फोन नंबरशी जोडलेल्या बँक खात्याची माहिती मिळते. त्यानंतर ते फोन नंबर ब्लॉक करतात आणि सिम स्वॅप करतात. यासह, वापरकर्त्याचे सिम ब्लॉक केले जाते आणि स्कॅमरना त्यात प्रवेश मिळतो.
या प्रकारे टाळा फसवणूक
4G वरून 5G वर स्विच करून फसवणूक लिंकवर क्लिक करू नका, असे सायबर सेलने म्हटले आहे. तुम्हाला असा कोणताही मेसेज मिळाल्यास, नेटवर्क ऑपरेटरशी त्याची खात्री करून घ्या. सायबर विंगने ग्राहकांना अनोळखी नंबर किंवा पाठवणार्याकडून “4G वरून 5G वर स्विच करा” अशा संदेशावर क्लिक करू नये, असा इशारा दिला आहे. हे करण्यापूर्वी दूरसंचार कंपनीच्या अधिकृत साइटला भेट देऊन तपशील तपासणे गरजेचे आहे.