गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या आवृत्त्यांची इंग्रजी ‘बाराखडी’ आता ‘एम’पर्यंत पोहोचली आहे. अँड्रॉइडची सुधारित आवृत्ती असलेली ‘मार्शमेलो’ ही ऑपरेटिंग सिस्टीम गुगलने अलीकडेच दाखल केली आहे. भारतीय बाजारातील स्मार्टफोनना आता कुठे अँड्रॉइडची ‘एल’ अर्थात ‘लॉलिपॉप’ आवृत्ती मिळू लागली असताना वापरकर्त्यांना आतापासूनच ‘मार्शमेलो’चे वेध लागले आहेत. मात्र, सध्या ही ऑपरेटिंग सिस्टीम काही विशिष्ट स्मार्टफोननाच मर्यादित आहे. त्यातही गुगलच्याच ‘नेक्सस’ श्रेणीतील ५, ६, ७ आणि ९ या स्मार्टफोनना या ऑपरेटिंग सिस्टीमचे अपडेट मिळाले आहेत. तर एलजीनेही ‘अँड्रॉइड एम’च्या उपलब्धतेत बाजी मारली आहे. भारतात हे अपडेट पोहोचण्यास वेळ असला, तरी ते नेमके कधी येणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. यानिमित्ताने विविध कंपन्यांतील या आवृत्तीच्या उपलब्धतेचा हा आढावा..
गुगल आणि नेक्सस – नेहमीप्रमाणे अँड्रॉइडच्या नव्या आवृत्तीचे अपडेट्स गुगल आणि नेक्ससच्या स्मार्टफोनना मिळाले आहेत. नेक्सस ५, ६, ७ आणि ९ यांना आधीच अपडेट देण्यात आले आहेत.
सॅमसंग – ‘अँड्रॉइड लॉलिपॉप’चे अपडेट पहिल्याप्रथम मिळवण्यात बाजी मारणाऱ्या सॅमसंगच्या गॅलक्सी एस५वर ‘मार्शमेलो’ पहिल्यांदा झळकण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच्या गॅलक्सी नोट ३ आणि एस४ यांना ‘मार्शमेलो’ मिळण्याची सुतराम शक्यता नाही.
एचटीसी – ‘एचटीसी’ने आपल्या ज्या स्मार्टफोनना ‘एम’ मिळणार आहे, त्यांची यादी आधीच प्रसिद्ध केली आहे. मात्र, प्रत्यक्षात ते अपडेट मिळण्यास किमान डिसेंबपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सोनी – सोनीनेही आपल्या ‘एम’ धार्जिण्या स्मार्टफोनची यादी जाहीर केली आहे. सोनीच्या एक्स्पीरिया झेड३, एक्स्पीरिया झेड५ कॉम्पॅक्ट, एक्स्पीरिया झेड५ प्रीमियम, एक्स्पीरिया झेड४ टॅब्लेट यांना ‘मार्शमेलो’ लवकरच लाभणार आहे.
एलजी – ‘मार्शमेलो’वर झडप टाकणाऱ्या गुगलेतर कंपन्यांमध्ये एलजीने बाजी मारली आहे. एलजीच्या जी४ या स्मार्टफोनमध्ये ही ऑपरेटिंग सिस्टीम असेल. मात्र, सध्या ते पोलंडमधील एलजीच्या फोननाच लागू होईल. त्यानंतर अमेरिका व युरोप येथील फोनचा क्रमांक लागेल. त्यानंतर भारतीय बाजारात हे अपडेट दाखल होतील.
‘मार्शमेलो’ची वैशिष्टय़े
* फोन ‘अनलॉक’ करण्यासाठी ‘फिंगर प्रिंट’ तंत्रज्ञानाची मदत
* ऑनलाइन खरेदीसाठी थेट पर्याय.
* बॅटरीच्या बचतीसाठी बऱ्याच सुधारणा. ठरावीक काळासाठी फोनचा वापर न झाल्यास तो ‘स्लीप’ मोडमध्ये जाणार.
* अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना परवानग्यांची मागणी नाही. पहिल्यांदा अ‍ॅप वापरताना परवानगी विचारणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा