आपल्या घरामध्ये असलेला टीव्ही हा काही आता केवळ दूरचित्रवाणी वाहिन्यांपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर त्याने आता विविधरूपे धारण केली आहेत. त्यातही तो आता बहुपयोगी असे उत्पादन झाला आहे. म्हणजे आता थेट त्याला कॅमेरा जोडला जातो आणि त्यावर टिपलेली चित्रे थेट मोठय़ा पडद्यावर पाहिली जातात. किंवा या टीव्हीच्या पडद्यालाच यूएसबी ड्राइव्ह आणून जोडला जातो आणि मग थेट संगणकाच्या स्क्रीनवर दिसतो त्याप्रमाणे त्यावर यूजर इंटरफेस येऊन सिनेमा पाहिला जातो. एखाद्याला वाटले गाणी ऐकावीत, तर तशी सोयही आताच्या टीव्हीवर असावी लागते. शिवाय हे सारे असावे ते आपल्या खिशाला परवडेल अशा किंमतीत. हीच खरी कसरत असते.
..काही ब्रॅण्डस् ग्राहकांना लागणारी ही कसरत व्यवस्थित पार पाडताना दिसतात. शिवाय आता टीव्ही ही काही केवळ घरात एकच असण्याची गोष्ट राहिलेली नाही. अनेक घरांमध्ये मोठा स्क्रीन दिवाणखान्यात असतो तर लहान आकाराचा टीव्ही स्क्रीन हा शयनकक्षामध्ये असतो. हे सारे बदल आता कंपन्यांनीही ध्यानात घेतले आहेत. आणि त्यानुरूप अशी उत्पादने बाजारपेठेत आणली आहेत. सध्या जमाना एलइडीचा आहे. त्यामुळे एलसीडीपेक्षा एलइडींना जास्त मागणी आहे. प्रसिद्ध एओसी कंपनीनेही हे सारे घटक लक्षात घेऊन विविध मॉडेल्स बाजारात आणली आहेत. त्यात अलीकडेच बाजारात आणलेल्या २९ इंची टेलिव्हिजन सेटचाही समावेश आहे. दिसायला अतिशय सडपातळ असलेला हा टीव्ही खास शयनकक्षासाठी सादर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. यात रीअल कलर इंजीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असतात तसेच रंग यावरही भासमान होतात.
याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला यूएसबी पोर्ट स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. त्यामुळे थेट यूएसबी जोडून तुम्ही सिनेमा तर पाहू शकताच पण शिवाय संगीतही ऐकू शकता. फोटो स्वतंत्रपणे पाहू शकता. याशिवाय सोबत असलेल्या एचडीएमआय पोर्टचा वापर करून हायडेफिनेशन गोष्टीचा आनंद लुटू शकता. याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे हा टीव्ही कंपनीने दिलेल्या तब्बल तीन वर्षांच्या वॉरंटीसह आपल्याला मिळतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. २२,४९०/-