आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. तेथे घडणाऱ्या घडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असते. यातूनच विज्ञान आणि संशोधनाच्या शाखा विकसित होत गेल्या. खगोलशास्त्र हा तर पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय आहे. यातूनच माणूस चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकला. पण तरीही असे अनेक प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जगातील विविध देश अंतराळ मोहिमांची आखणी करतात. यातूनच भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’चा जन्म झाला हा उपग्रह सप्टेंबर अखेरीस अंतराळात झेपावला आणि त्याने तेथील पहिली परीक्षाही उत्तीर्ण केली.
सोमवारी भारताची अवकाशातील पहिल्या अंतराळ वेधशाळेतून एक छायाचित्र आले आणि खगोल वैज्ञानिकांमध्ये जल्लोष सुरू झाला. अर्थात या छायाचित्रातून फारकाही नवी माहिती मिळाले असे नाही तर हे अॅस्ट्रोसॅट या भारताच्या अवकाश वेधशाळेत बसविण्यात आलेली निरीक्षण प्रणाली योग्य असल्याचे यामुळे सिद्ध झाले. यामुळे अॅस्ट्रोसॅट पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची चर्चा खगोल वैज्ञानिकांमध्ये रंगू लागली आहे.
अॅस्ट्रोसॅटने सोमवारी पृथ्वीवर धाडलेले छायाचित्र हे ‘क्रॅबनेबुला’चे होते. वृषभ राषीच्या चिन्हाच्या शिंगाच्या वरच्या बाजूस क्रॅब नावाचा चार इंचांचा तेजोमेघ आहे. हा सर्वप्रथम 1054मध्ये चीनमध्ये पाहिला गेला होता. याचा प्रकाश इतका मोठा होता की तो अगदी साध्या डोळ्यानेही दिसत असे. रात्री सर्वात तेजस्वी दिसणारा हा क्रॅब आहे. प्रत्यक्षात एखादा तारा जेव्हा अखेरच्या टप्प्याचा प्रवास करत असतो त्यावेळेस तो अधिक प्रज्वलित होतो. पण त्यावेळेस लोकांना तो ता-याचा जन्म आहे असे वाटले. अशाप्रकारच्या नोंदी आढळतात. कालांतराने या क्रॅबचा प्रकाश कमी कमी होत गेला. पण तरीही हा क्रॅब प्रकाशमान मानला जातो. अगदी साध्या दुर्बिणीतूनही जर आकाशात पाहिले तरी हा क्रॅब सहज दिसतो. यामुळेच अवकाशातील ता-यांचा वेध घेणारे खगोलप्रेमी आणि अभ्यासक वेध घेणारे कोणतेही नवीन उपकरण आणले की त्यातून सर्वप्रथम हा क्रॅब पाहतात. हा क्रॅब योग्य प्रकारे दिसला की आपले उपकरण योग्य आहे असे मानले जाते. असे काही अवकाशातील प्रमाणं आहेत जे नवीन उपकरणाची योग्यता तपासण्यासाठी पाहिली जातात. यातील या क्रॅबचा टप्पा भारतीय अवकाश वेधशाळा अॅस्ट्रोसॅटने पूर्ण केला आहे. हे एकप्रकारे अॅस्ट्रोसॅटच्या चमूचे पहिले यश म्हणता येईल.
अॅस्ट्रोसॅटचा यानंतरचा टप्पा म्हणजे हंस तारकासमूहातील क्ष-किरणांचा अभ्यास करण्याचा असेल. त्या ठिकाणी कृष्ण विविर आहे असे निरीक्षण जगभरातील बहुतांश खगोल अभ्यासकांनी नोंदविले आहे. अॅस्ट्रोसॅटने त्याचा वेध घेतल्यावर ते अधिक स्पष्ट होणार असून त्यातील काही दुरुस्त्याही मिळण्याची शक्यता खगोल अभ्यासक अभय देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. अंतराळातील पहिल्या यशानंतर आता हा उपग्रह नेमके कोणते काम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
BLOG : अॅस्ट्रोसॅट अंतराळातील पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण
खगोलशास्त्र हा पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय.
Written by विश्वनाथ गरुड
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-10-2015 at 10:45 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrosat captures its first image of crab nebula