ब्लॅकबेरी क्यू१०
पूर्वी केवळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशीच नोकरीची वेळ असायची शिवाय त्यामध्ये असलेली व्यग्रताही फार कमी असायची. ऑफिस सोडले की, मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला येईपर्यंत कुणाला फारसा काही ताण नसायचा. पण आता काळही बदलला आणि वेळही बदलली आहे. अनेकांचा दिवस हा आता २४ गुणिले ७ असतो. त्यामुळे २४ तास काम अशीच काहीशी अवस्था. त्यातही झोपताना फोन सुरू आणि उशाशीच असतो, अशी अनेकांची अवस्था आहे. त्यामुळे कार्यालयीन काम आणि वैयक्ति आयुष्य यामध्ये एक मेळ साधावा लागतो. अनेकांना तो साधता येत नाही आणि मग यामुळे नैराश्य पदरी पडते. ही परिस्थिती लक्षात घेऊनच ब्लॅकबेरी या विख्यात कंपनीने त्यांची ब्लॅकबेरी १० ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणताना त्यात विचारपूर्वक दोन गोष्टी केल्या. पहिली म्हणजे त्यांनी आजवर केवळ व्यावसायिकांसाठीचा असलेला स्मार्टफोन ही ब्लॅकबेरीची प्रतिमा बदलली. आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा सुखद मेळ साधणारा स्मार्टफोन अशी त्याची नवीन प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली. ‘ब्लॅकबेरी १०’ या नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि कार्यालयीन बाबी पूर्णपणे वेगळ्या ठेवण्याची चांगली सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  क्वर्टी की बोर्ड हे ब्लॅकबेरीचेच मुख्य वैशिष्टय़ होते. त्यानंतर अनेकांनी ते प्रत्यक्षात आणले. हाच क्वर्टी की बोर्ड आजही ब्लॅकबेरीचे वैशिष्टय़ आहे. मध्यंतरी ब्लॅकबेरीने त्यांच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये क्वर्टी की बोर्ड टचस्क्रीन स्वरूपात दिला होता. त्यानंतरही अनेकांनी प्रत्यक्ष की बोर्ड असावा, अशी विनंती केली. त्यानंतर आता हे मॉडेल बाजारात आणले आहे. याला ३.१ इंचाचा स्क्रीन आहे. त्यासाठी ओएलइडी डिस्प्ले वापरण्यात आला आहे. याशिवाय ब्लॅकबेरी हब ही नवीन सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय बीबी मेसेंजरसारख्या नियमित सेवाही आहेतच दिमतीला.
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. ४४,९९०/-
वैदेही

Story img Loader