स्मार्टफोनच्या स्पर्धेतून जन्माला आलेल्या टॅब्लेटने हळूहळू मोबाइलसोबतच कम्प्युटरची बाजारपेठही गिळायला सुरुवात केली आहे. स्मार्टफोनपेक्षा अधिक स्मार्ट आणि कम्प्युटर किंवा लॅपटॉपपेक्षा जरासा कमी अशा मधल्या पातळीवर असलेले टॅब्लेट सध्या शेकडोंनी विकले जात आहेत. ऑफिस, ई मेल, मोठी स्क्रीन, मल्टी टास्किंग यांमुळे टॅब्लेटना ‘मिनी लॅपटॉप’ समजले जाते. पण तरीही डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा नोटबुक पीसीच्या तुलनेत ते बरेच पिछाडीवर आहेत. त्यामुळे लॅपटॉपची बाजारामधील नवलाई अजूनही शाबूत आहे. त्यातच आता कमी वजनाचे, त्यातल्या त्यात कमी आकाराचे आणि कमी जाडीचे लॅपटॉप बनवण्याकडे सर्वच कंपन्यांचा कल राहिला आहे. असे असले तरी, किंमत हा अडसर आहेच. उत्तम प्रोसेसिंग स्पीड, जास्त मेमरी किंवा दर्जेदार अतिरिक्त वैशिष्टय़े असलेले लॅपटॉप ४०-५० हजारांच्या पुढेच उपलब्ध आहेत. तरीही सध्या काही असेही लॅपटॉप आहेत, जे ४० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे असूनही त्यामध्ये दर्जेदार वैशिष्टय़े पाहायला मिळतात. सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरांत उपलब्ध असलेल्या लॅपटॉपवर एक दृष्टिक्षेप :
एसर अॅस्पायर व्ही ५-४३१
स्वस्तातला किंवा तुलनेने कमी किमतीचा लॅपटॉप म्हटलं की त्यातील स्पेसिफिकेशन्सशी तडजोड करावी लागतेच; पण त्याचबरोबर त्याचा ‘लुक’ही सर्वसाधारण किंवा ढोबळ असतो. त्यामुळे बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेले ब्रॅण्डेड कंपन्यांचे लॅपटॉप ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. पण एसरचा अॅस्पायर व्ही ५-४३१ याबाबतीत निश्चितच ग्राहकांचे समाधान करू शकतो. कमी वजन असलेला, प्रवासात किंवा कार्यालयात कुठेही व्यवस्थित हाताळता येऊ शकणारा, इंटरनेटच्या नियमित वापरासाठी किंवा मूव्हीज पाहण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप हवा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. यामधील १.५ गिगाहर्ट्झचा सॅण्डी ब्रिज इन्टेल पेंटियम ९८७ प्रोसेसर हा कमी क्षमतेचा प्रोसेसर आहे. मात्र, या सोबतच इन्टेल एचडी ग्राफिक्स कार्ड, दोन जीबी रॅम आणि ५०० जीबीची हार्डडिस्कही पुरवण्यात आली आहे. विंडोज ७ होम बेसिक (६४ बिट) ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या या लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ आणि वायफायची सुविधा पुरवण्यात आली आहे. मात्र, या दोघांसाठी स्वतंत्र इंडिकेटर्स नसल्याने किंचित गैरसोय होते. कीबोर्डचा आकार मोठा असला तरी त्यासाठी स्वतंत्र न्युमरिक कीपॅडचा बळी देण्यात आला आहे. लॅपटॉपची स्क्रीन १४ इंच आकाराची आहे.
किंमत २५,५०० रुपयांपर्यंत.
सॅमसंग एनपी३००ई५झेड-ए०एमआयएन
(NP300E5Z-A0MIN)
स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या क्षेत्रात तगडी उत्पादने आणणाऱ्या सॅमसंगचा हा लॅपटॉप कमी किमतीतील पण उत्तम पर्याय ठरू शकतो. सिल्व्हर आणि ब्लॅक रंगाचे फिनिशिंग असलेला हा लॅपटॉप दिसायला शानदार नसला तरी तो काम करायला निश्चितच दमदार आहे. यात २.३ गिगाहर्ट्झचा इन्टेल कोअर आय३ प्रोसेसर असून ४ जीबी रॅम आणि इन्टेल एचडी ग्राफिक्स कार्ड ३००० यांमुळे लॅपटॉपवरील प्रोसेसिंग जलद आहे. शिवाय यामध्ये ७५० जीबीची हार्डडिस्क असल्याने जागेची टंचाई जाणवणार नाही. लॅपटॉपची स्क्रीन १५.६ इंच आकाराची आणि १३६६ ७७६८ रेझोल्युशन असलेली आहे. एचडी ऑडिओ, ब्लूटूथ, वायफाय, कॅमेरा या सर्वानी लॅपटॉपला वरच्या श्रेणीतील लॅपटॉपच्या पंक्तीत नेऊन ठेवले आहे. सॅमसंगच्या ईस्टोअरवर या लॅपटॉपची किंमत ३३ हजार रुपयांपेक्षा किंचित जास्त ठेवण्यात आली आहे. मात्र, फ्लिपकार्ट आणि अन्य काही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर हा ३० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. सॅमसंगने या लॅपटॉपसोबत विंडोज डॉस ऑपरेटिंग सिस्टिम पुरवली असली तरी काही डीलर्स या सोबत विंडोज ७ची सीडी किंवा इन्स्टॉलेशनही करून देत आहेत.
किंमत: ३०-३३ हजार रुपये
एसर अॅस्पायर ई१-५७१
स्वस्त दरातील लॅपटॉप किंवा नोटबुक बनवण्यावर एसरने आधीपासूनच भर दिला आहे. त्यामुळे कमी किमतीतील लॅपटॉपच्या श्रेणीत या कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स दिसतात. अॅस्पायर ई१-५७१ हादेखील यातलाच एक लॅपटॉप आहे. २८८०० रुपयांच्या आसपास किमतीच्या या लॅपटॉपमधील फीचर्ससारखे फीचर्स असलेले अन्य कंपन्यांचे लॅपटॉप्स ३५ ते ४० हजारांच्या श्रेणीत उपलब्ध आहेत. २.३ गिगाहर्ट्झ प्रोसेसिंग स्पीड असलेला कोअर आय५ प्रोसेसर, २ जीबी रॅम, ५०० जीबी हार्डडिस्क यांनी हा लॅपटॉप सक्षम बनवला आहे. १५.६ इंच एचडी एलईडी टीएफटी डिस्प्ले, वेबकॅम, संपूर्ण कीबोर्ड, दोन स्पीकर, तीन यूएसबी २.० पोर्ट अशी चांगली वैशिष्टय़े या लॅपटॉपमध्ये आहेत. शिवाय हा लॅपटॉप दिसायलाही आकर्षक आहे. किंमत: २८८०० रुपयांपर्यंत.
असूस एक्स५५२ईए-एसएक्स००६डी
गेल्याच महिन्यात बाजारात दाखल झालेला हा लॅपटॉप स्वस्त आणि चांगला पर्याय आहे. यातील १.५ गिगाहर्ट्झ क्षमतेचा एएमडी ए४ क्वाड कोअर प्रोसेसर सर्वसाधारणपणे लॅपटॉपसाठी कमीच आहे. पण कंपनीने ४ जीबी रॅम देऊन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय यामध्ये एएमडीचाच रेडऑन एचडी ८३३० ग्राफिक्स कार्डही पुरवण्यात आले आहे. ५०० जीबी क्षमतेची हार्डडिस्क जागेची टंचाई जाणवू देत नाही. तसेच १५.६ इंच आकाराची स्क्रीन मूव्हिज किंवा गेम्ससाठी सक्षम आहे. वायफाय, ब्लूटूथ ४.०, एचडी वेबकॅम, कार्ड रीडर अशा सुविधा यामध्ये पुरवण्यात आल्या आहेत.
किंमत २६,२९० रुपये.
लेनोव्हो जी५७०
सॅमसंगच्या लॅपटॉपप्रमाणेच ३० हजार रुपयांच्या वरखाली उपलब्ध असलेला हा लॅपटॉप फ्लीपकार्ट आणि अन्य काही संकेतस्थळांवर २८ हजार ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. लेनोव्होच्या जी सीरिजमधील हा लॅपटॉप मेटालिक ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. २.४ गिगाहर्ट्झ क्षमतेचा कोअर आय३ प्रोसेसर आणि दोन जीबी रॅम असलेला हा लॅपटॉप जलद क्रिया करतो. यामध्ये ३२० जीबीची हार्डडिस्क असून १५.६ इंचाची एचडी एलईडी ग्लेअर स्क्रीन आहे. याशिवाय ०.३ मेगापिक्सेलचा वेबकॅम, ब्लूटूथ, वायफाय, स्वतंत्र न्युमरिक कीपॅड आणि कार्ड रीडर अशी वैशिष्टय़े या लॅपटॉपमध्ये पुरवण्यात आली आहेत.
किंमत: २८,५०० रुपयांपर्यंत (ऑनलाइन शॉपिंग)