महाविद्यालयील तरुण आणि निवृत्त मंडळी यांच्यासाठी स्वस्त आणि स्मार्ट अशा फोन्सची सध्या चांगलीच गरज निर्माण झाली आहे. यासाठी विविध कंपन्याही त्याप्रमाणे कामाला लागल्या आणि त्यांनी असे फोन बाजारात आणण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक म्हणजे इंटेक्स क्लाउड एन. कंपनीने याआधी अ‍ॅक्वा मालिका लाँच करून बाजारात आपले स्थान निश्चित केले होते. त्यानंतर आता क्लाऊड एन ही मालिका बाजारात आणली आहे. हा फोन ई-बे या ऑनलाइन बाजारपेठेत दाखल करण्यात आला होता.
स्वस्तात मोबाइलची विक्री करणाऱ्या इतर ब्रँड्सप्रमाणेच कंपनीने फोन डय़ुएल सिम ठेवला आहे. हा फोन अँड्रॉइड ४.४.२ किटकॅट या व्हर्जनवर काम करतो. याचा डिस्प्ले ४८० गुणिले ८०० पिक्सेलचा डब्ल्यूव्हीजीए असून त्याचा आकार चार इंचांचा आहे. मात्र हा डिस्प्ले इतर मोबाइलच्या तुलनेत दृष्यमानतेमध्ये उणा ठरतो. या फोनमध्ये १.२ गीगाहार्टझचा क्वाड कोर स्पेक्ट्रम प्रोसेसर एक जीबी रॅमसह देण्यात आला आहे. यामुळे फोनला तुलनेत वेग चांगला आहे. स्टोअरेजच्या बाबतीत हा फोन या किमतीत इतर कंपन्यांच्या तुलनेत उजवा ठरतो. यामध्ये अंतर्गत स्टोअरेज आठ जीबीइतकी देण्यात आली आहे. याशिवाय आपण ६४ जीबीपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड वापरून स्टोअरेज वाढवू शकतो. पण या फोनचा टचचा प्रतिसाद फारसा चांगला नाही. तसेच फारसा अचूकही नाही. यामुळे आपण फोनमधील एखादा पर्याय टच करून निवडल्यावर अनेकदा तो ओपन होण्यासाठी बराचसा वेळ द्यावा लागतो.
या फोनमध्ये कॅमेरा एलईडी फ्लॅश लाइटसह आठ मेगापिक्सेलचा असला तरी त्याच्या छायाचित्राचा दर्जा इतर आठ मेगापेक्सेलच्या कॅमेऱ्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. यात दोन मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये देण्यात आलेल्या सुविधांच्या तुलनेत त्याला देण्यात आलेल्या बॅटरीची क्षमता फारच कमी आहे. ती केवळ १४०० एमएएच आहे. यामुळे जर आपण थ्रीजीवर फोन पूर्ण वापरला तर तो केवळ अडीच ते तीन तासच चालू शकतो. फामध्ये थ्रीजी, जीपीआरएस/ईडीजीई, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, एजीपीएस, मायक्रो यूएसबी आणि ब्ल्युटूथचा पर्याय आहे. फोनमधील गाण्यांचा आवाज हा चांगला येतो. तसेच स्पीकरचा दर्जाही चांगला आहे, यामुळे आवाजावर फारसा परिणाम होत नाही. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे हा फोन वजनाने कमी असून तो हाताळण्यास अगदी सोपा आहे. दिसायलाही तो चांगला असून फिचर फोनच्या किमतीत स्मार्टफोनचा अनुभव देणारा आहे.   किंमत – ४१९९ रुपये. (ई-बेवर)
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com