फेसबुकवर दररोज तीस कोटींहून अधिक फोटो अपलोड होतात. यापैकी 40 कोटी फोटो हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून अपलोड केले जातात. याचाच अर्थ असा आहे की फोटो काढण्यासाठी मोबाइलचा जास्तीत जास्त वापर केला जातो. केवळ फेसबुकचीच नव्हे तर व्हॉट्सअॅपसह अन्य समाज माध्यमांवर अपलोड होणाऱ्या फोटोंपैकी बरेचसे फोटो हे मोबाइलवरूनच क्लिक केलेले असतात. मोबाइलमध्ये स्मार्ट कॅमेराज आले असून त्यात दोन मेगापिक्सेलपासून 15 मेगापिक्सेलपर्यंत मजल मारली आहे. याचबरोबर अनेक कंपन्यांनी कॅमेऱ्यामध्ये विशेष झूमिंगची सुविधाही दिलेली असते. पण यालाच जोड म्हणून बाह्य कॅमेरा लेन्सेस लावण्याचा नवा ट्रेंड रूढ होऊ लागलाय. पाहुयात बाजारात मोबाइल कॅमेऱ्यासाठी कोणत्या लेन्सेस उपलब्ध आहेत.
इझी ऑर्बिट
ब्लॉगर किंवा ज्यांना रस्त्यावर जाता-येता दिसणाऱ्या विविध गोष्टी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायची सवय असते अशांसाठी मोबाइल कॅमेऱ्याची ही लेन्स उपयुक्त ठरू शकते. या लेन्समध्ये विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियमच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले कवच देण्यात आले आहे. याच्या आतमध्ये तीन लेन्सला एकाच वेळी जोडणारी प्रणाली देण्यात आली असून यामुळे कॅमेऱ्याला 180 अंशात दृष्टी मिळते. या लेन्सला 67 एक्स वाइड अँगल आणि दोन एक्स टेलिफोटो ऑप्टिक्स देण्यात आले आहेत. ईझीकडे पेटेंट असलेले स्टॅबिलायझिंग ग्रीपच्या तंत्रज्ञानामुळे फोटो शेक होणे किंवा अन्य प्रकार यामधून घडत नाहीत. ही लेन्स आयफोनसाठीही उपयुक्त आहे.
ओलोक्लिप
ओलोक्लिप्सच्या अनेक मोबाइल कॅमेरा लेन्सेस बाजारात उपलब्ध आहेत. लांबचे छायाचित्र टिपणे आणि छायाचित्रातील रंग टिपणे हे ओलोक्लिपच्या लेन्सचे वैशिष्टय़ आहे. दोन एक्स टेलिफोटो लेन्सही जवळच्या वस्तूचे छायाचित्र अगदी चोख टिपते. तसेच यात पोलायझर लेन्सेस असल्यामुळे छायाचित्रातील रंगसंगतीसह त्याचे बारकावेही अगदी छान टिपले जातात. ही लेन्स इंस्टाग्राम आणि कॅमेरा प्लससारख्या विविध फोटो अॅप्ससाठीही काम करू शकते. ओलोक्लिपच्या विविध प्रकारच्या लेन्सेस अँड्रॉइडसोबतच आयफोनवरही काम करतात. याशिवाय या लेन्समध्ये दोन्ही बाजूंना लेन्स देण्यात आलेली आहे. यामुळे आपण मुख्य कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा या दोन्हीसाठीही लेन्सचा वापर करून अधिक चांगले फोटो काढू शकतो.
सोनी क्यूएक्स 100 स्मार्टफोन लेन्सेस
स्मार्टफोनचे कॅमेऱ्यात रूपांतर करावयाचे असेल तर सोनीच्या या लेन्सेस तुम्हाला खूप मदत करू शकतात. या लेन्सच्या मदतीने तुम्ही अँड्रॉइडवर चालणाऱ्या तुमच्या कोणत्याही मोबाइलचे रूपांतर स्मार्ट कॅमेरामध्ये करू शकता. यामध्ये एक इंचाच्या 20.2 मेगापिक्सेलचा इमेज सेंसर देण्यात आला आहे. ही लेन्स एनएफसी किंवा वाय-फायवरही काम करू शकते. याशिवाय लेन्समध्ये मायक्रो एसडीची आणि मेमरी स्टिकसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय यासोबत ट्रायपॉड आणि ऑप्टिकल क्लिप देण्यात आली आहे. ज्यामुळे आपण आपल्या फोनच्या मागच्या बाजूस ही लेन्स जोडू शकतो.
ओरिए
स्मार्टफोनला जोडणारी ही लेन्स बारा एक्स ऑप्टिकल झूम इन क्षमतेची आहे. हे एक प्रकारचे ऑप्टिकल टेलिस्कोप लेन्स आहे. याच्यासोबत देण्यात आलेल्या होल्डरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याजवळ ही लेन्स अॅडजेस्ट करू शकता. याच्यासोबत येणारा छोटा ट्रायपॉड तुमचा मोबाइल स्थिर राहण्यासाठी मदत करतो. यामुळे छायाचित्र अधिक कसदार येते. या लेन्समध्ये मॅन्युअल फोकस उपलब्ध करण्यात आला आसून, याचा दर्जा डीएसएलआरच्या माध्यमातून काढलेल्या छायाचित्राप्रमाणे येतो. याच्या जोडणीसाठी कोणत्याही प्रकारच्या वायरची गरज भासत नाही. याचे होल्डर आपण फोनला जोडले की काम झाले. या लेन्सच्या मदतीने लांबच्या अंतरावरील तसेच जास्तीत जास्त दृष्टिक्षेपातील दृश्य छायाचित्रात कैद करता येऊ शकते.
क्लिप लेन्स
लेन्स सांभाळणे जर कठीण होत असेल तर तुम्ही या क्लिप लेन्सचा वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला एक क्लिप मिळते. ज्या क्लिपला लेन्स जोडलेली असते. या लेन्सच्या माध्यमातून आपला मोबाइल कॅमेरा झूम इन किंवा झूम आऊट करू शकतो. ही क्लिप अगदी हलक्या वजनाची असून ती बाळगण्यास सोपे जाते. या क्पिलच्या माध्यमातून आपण 180 अंशातील दृश्ये टिपू शकतो. ही क्लिप आयफोन, एचटीसी, सॅमसंग अशा विविध ब्रँड्सच्या मोबाइलला जोडली जाऊ शकते.
टेलिस्कोप कॅमेरा
नऊ एक्स टेलिस्कोप झूमद्वारे आपण लांबचे छायाचित्रण अगदी चांगल्याप्रकारे करू शकतो. या नऊ एक्स टेलिस्कोप लेन्ससोबत एक अॅडजस्टेबल स्टँड देण्यात आले आहे. या स्टँडच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारच्या व कोणत्याही आकाराच्या मोबाइलमध्ये ही लेन्स जोडू शकतो. एकदा का लेन्स योग्य प्रकारे जोडली गेली की ती न हालता उत्तम प्रकारे काम करू शकते. यामध्येही आपण डीएसएलआरच्या दर्जाचे छायाचित्र टिपू शकतो.
एलईडी फ्लॅश
प्रत्येक मोबाइलला सध्या फ्लॅश लाइट देण्यात आलेला असतो. पण अगदी किर्र्र अंधारात प्रत्येक वेळी तो योग्य प्रकारे काम करतोच असे नाही. अशावेळी एलईडी फ्लॅश उपयुक्त ठरू शकतात. खास मोबाइलच्या छायाचित्रणासाठी किंवा व्हिडीओ शूटिंगसाठी हे लाइट्स तयार करण्यात आले आहेत. हे लाइट्स आपण ज्या ठिकाणी हेडफोन्स लावतो त्याच ठिकाणी जोडले की काम करू लागतात. शिवाय हे लाइट्स वापरण्यासाठी मोबाइलची बॅटरी खर्च करण्याची गरज नसून या लाइटला बॅटरी देण्यात येते. ही बॅटरी चार्ज केली की हे लाइट्स काम करू शकता. आपल्याला छायाचित्रणासाठी हे लाइट्स वापरायचे नसतील तरी अंधारात प्रकाशासाठी आपण हे लाइट्स वापरू शकतो.
(वरील उपकरणे विविध ई-व्यवसाय संकेतस्थळांवर उपलब्ध असून त्यांची किंमत एक हजारापासून ते आठ हजारापर्यंत आहे.)
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा